Published On : Fri, Dec 13th, 2019

महापौर सहाय्यता निधीसाठी विधी समिती सभापतींनी दिले मानधन

Advertisement

नागपूर : शहरातील गरजू खेळाडू, वैद्यकीय लाभापासून वंचितांना मदत मिळवून देण्यासाठी महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘महापौर सहाय्यता निधी’च्या मदतीसाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. नुकतेच मनपातील विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम यांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन ‘महापौर सहायता निधी’साठी दिले.

शहरातील अनेक प्रतिभावंत खेळाडू केवळ पैशाअभावी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांना जाउ शकत नाही. तसेच पैशाअभावी अनेकांना योग्य उपचार घेता येत नाही. प्रतिभा असूनही पैशाअभावी भविष्य पूर्ण न करू शकणा-या व पैशांमुळे उपचाराअभावी होरपळणा-यांसाठी सहाय्य म्हणून महापौर संदीप जोशी यांनी पुढाकार घेत महापौर पद ग्रहण करताच ‘महापौर सहाय्यता निधी’ सुरू करण्याची घोषणा केली. महापौर पद ग्रहण केल्यानंतर अभिनंदनासाठी येणा-यांकडून हार, पुष्पगुच्छ न स्वीकारता तो पैसा ‘महापौर सहायता निधी’करीता देण्याचे आवाहन त्यांनी केले. महापौरांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसादर मिळत असून अनेकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे स्वत: महापौरांनीही आपले मानधन ‘महापौर सहाय्यता निधी’ करीता देण्याचा निर्णय घेतला. महापौरांच्या या आवाहनाला आता मनपामधूनही प्रतिसाद मिळत आहे. विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम यांनी त्यांच्या एक महिन्याच्या मानधनाचा धनादेश गुरूवारी (ता.१२) महापौरांकडे सुपूर्द केले.

महापौर सहाय्यता निधीच्या माध्यमातून आपल्या शहरातील अनेक प्रतिभावंत खेळाडूंना उंच भरारी घेता येणार आहे. तसेच अनेकांना नवजीवन मिळणार आहे, त्यामुळे नागरिकांनी ‘महापौर सहाय्यता निधी’च्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. ‘महापौर सहाय्यता निधी’ करीता मदत करणा-यांना कर सवलत देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.