Published On : Thu, May 14th, 2020

विविध राज्यातील 13 हजार 346 नागरिकांची घरवापसी

– पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांचे सेवाकार्य

9 राज्यातील वाटसरुंना 354 बसेसनी पोहचविले स्वगावी

नागपूर : ‘लॉकडाऊन’मुळे संपूर्ण देशात निर्माण झालेली परिस्थितीत मोठ्या प्रमाणात शहरातील नागरिकांचे स्थलांतर सुरु झाले, संपूर्ण दळणवळण ठप्प असल्यामुळे इतर राज्यातील रहिवाशी हजारो मैलाचा प्रवास करुन थकलेल्या नागरिकांचा प्रवास नागपूर पोलीस व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यामुळे तर झालाच त्यासोबतच घरवापसीचा आनंद देणारा ठरला. देशाच्या विविध भागातून पायी प्रवास करणाऱ्या नागरिकांना नागपूर पोलिसांनी सामाजिक जाणीवेतून केवळ निवाराच दिला नाही. तर त्यांना त्यांच्या राज्यात खाजगी व शासकीय बसेसच्या माध्यमातून पोहचविण्याचा अभिनव उपक्रम राबवला.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशावर मोठे संकट निर्माण झाल्यामुळे ‘लॉकडाऊन’चा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे उद्योग व व्यवसाय ठप्प झाले. देशाच्या विविध शहरात रोजगारासाठी आलेल्या नागरिकांवर बेकारीचे संकट कोसळल्यामुळे तसेच संपूर्ण दळणवळण बंद असल्यामुळे पायी प्रवास करुन स्वग्रामी निघालेल्या नागरिकांना नागपूर सीमेवर थांबवून त्यांच्या निवारा व भोजनाचा खर्च सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून करण्यात आला. विविध 9 राज्यातील 27पेक्षा जास्त जिल्ह्यातील 13 हजार 346 पेक्षा जास्त वाटसरुंना सुखरुप घरी पाठविण्यात आले. 354 खाजगी व शासकीय बसेसची व्यवस्था करुन वाटसरुंच्या घरापर्यंत पोहचविण्याचे कार्य नागपूर पोलिसांनी केले आहे.

नागपूर शहराच्या सीमेवर मुंबईसह राज्याच्या विविध भागातील तसेच आंध्र, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यातील पायदळ प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना थांबवून त्यांना मानवतेच्या दृष्टीने अन्न, पाणी, निवारा तसेच हजारो किलोमीटर पायी चालत आलेल्या नागरिकांना चप्पल व जोडे आदी सुविधा शहरातील विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून पुरविण्यात आल्या. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय व अपर पोलीस आयुक्त निलेश भरणे, वाहतूक शाखेचे उपायुक्त विक्रम काळे यांनी संकटात सापडलेल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा देण्याचे कार्य केले आहे.

9 राज्य आणि 13 हजार 346 नागरिक
कोरोनामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी समूहासमूहाने आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेवून प्रवासाला सुरुवात केली. अशा प्रवाशांना शहराच्या प्रमुख मार्गावरील पांजरी टोल नाका तसेच मध्यवर्ती बसस्थानक येथे थांबवून त्यांची पुढील प्रवासाची नि:शुल्क व्यवस्था करण्यात आली. नागपूर शहर पोलीस व विविध सेवाभावी संस्थांनी 9 राज्यातील 27पेक्षा जास्त जिल्ह्यातील 13 हजार 320 गावी नागरिक 354 खाजगी तसेच शासकीय बसेस, चार श्रमिक विशेष रेल्वेच्या माध्यमतातून पाठविण्यात आले. यामध्ये पश्चिम बंगालच्या मिदनापूर पर्यंतच्या नागरिकांचा समावेश होता.

हजारो मैलाचा प्रवास करुन समुहाने शहरात दाखल झालेल्या नागरिकांना थांबवून त्यांची संपूर्ण माहिती गोळा करण्यात आली. त्यानुसार पुढील प्रवासासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये मध्य प्रदेशच्या 9 जिल्ह्यातील 5 हजार 169 नागरिकांना 192 बसेच्या माध्यमातून त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्यात आले. छत्तीसगड 3 हजार 500 नागरिक 140 बसेसच्या माध्यमातून, राजस्थानमधील 90 नागरिक 3 बसेस, उत्तरप्रदेश 120 नागरिक 3 बसेस तसेच श्रमिक स्पेशल रेल्वेने दीड हजार नागरिकांना लखौनव, बलियापर्यंत गुजरात येथील 7 नागरिकांना दोन बसेसच्या माध्यमातून, बिहार येथील 1 हजार200 बस व रेल्वेच्या माध्यमातून तर पश्चिम बंगाल येथील 90 नागरिकांना कोलाकाता व मिदनापूर येथून बसेच्या माध्यमातून पोहचविण्याची व्यवस्था करण्यात आली.

राज्याच्या विविध भागातील आलेल्या नागरिकांना सुद्धा त्यांच्या गावापर्यंत पोहचविण्यात आले. त्यामध्ये तीन गर्भवतीचा सुद्धा समावेश आहे. पांजरी टोल नाका येथे विसावा घेत असलेल्या व अनवाणी पायाने प्रवास करीत असलेल्या 5 हजार पेक्षा जास्त नागरिकांना स्वयंसेवी संस्थेमार्फत जोडे व चप्पल यांची व्यवस्था करण्यात आली.

वैद्यकीय सुविधा व तपासणी
राज्यातून तसेच परराज्यातून पायी प्रवास करीत असलेल्या सर्व नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी सुद्धा करण्यात आली. यासाठी पांजरी टोल येथे छोटे हास्पिटल तयार करण्यात आले. वैद्यकीय तपासणी नंतर इतरराज्यात जाण्यासाठी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातून मूळ गावी जाण्यासाठी परवानगी देण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त निलेश भरणे यांनी दिली.