मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरणावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणी आरोप -प्रत्यारोप सुरु असताना आमदार सुरेश धस यांच्याकडून काही अभिनेत्रींच्या नावाचा उल्लेख करण्यात आला.
परळीचा सांस्कृतिक पॅटर्न असे म्हणत आमदार धस यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतले. अप्रत्यक्षपणे मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव धनंजय मुंडे यांच्यासोबत जोडलं गेल्यानंतर प्राजक्ताने संताप व्यक्त केला. पत्रकार परिषद घेऊन तिने तिची भूमिका मांडली. तसंच, तिच्यावर चिखलफेक करण्याऱ्यांनी माफी मागावी, असे आवाहनही केले. तिच्या भूमिकेनंतर तिच्या समर्थनार्थ मंत्री पंकजा मुंडे यांनीही पोस्ट केली आहे.
पंकजा मुंडे पोस्टमध्ये म्हणाल्या की, ‘शक्ती’ शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही.. त्रिदेव ही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे.. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची.. ‘दुर्दैवी घटना’हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे.. भावना कुठे आहेत? चिमुकल्यांचे बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निघृण हत्या या थांबवणे शक्य आहे ना पण कायद्याने ,नियमाने !! ते राहिले बाजूला नुसती चिखल फेक..
दुर्दैवाने soft targetआहे स्त्री आणि तिचे सत्व..काल पाहवलं नाही ,पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे?तरी एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसूक साथ मात्र राहावी, अशी पोस्ट करत पंकजा मुंडे यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीला पाठींबा दिला आहे.