Published On : Fri, Aug 6th, 2021

प्रलंबित मागण्यांकरिता मनपा कर्मचा-यांचे धरणे

आयुक्तांना दिले निवेदन : मागण्या मंजूर न झाल्यास आंदोलनाचा इशारा

नागपूर : नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत कर्मचा-यांनी बुधवारी (ता.४) विविध प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात धरणे दिले. कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉइज असोसिएशनद्वारे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना निवेदनही देण्यात आले.

विशेष म्हणजे, कर्मचा-यांद्वारे कामाच्या वेळेत कुठलाही अडथळा निर्माण होऊ न देता दुपारच्या अवकाश कालावधीमध्ये कर्मचा-यांद्वारे मनपा मुख्यालयातील हिरवळीवर धरणे देण्यात आले. शिष्टमंडळात राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉइज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, जनरल सेक्रेटरी रंजन नलोडे, कोषाध्यक्ष प्रवीण तंत्रपाळे आणि सर्व संगणक चालक आदी उपस्थित होते.

अधिसंख्य पदावरील कर्मचा-यांना शासन निर्णयाप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा. महानगरपालिकेमध्ये कार्यरत १९२ संगणक ऑपरेटर्सची सेवा अबाधित ठेवून त्यांना किमान वेतन देण्यात यावे. अधिसंख्य पदावरील सफाई कमगारांना लाड पागे समितीच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात. ऐजवदार सफाई कामगारांना स्थायी करण्याची २० वर्षाची अट शिथिल करण्यात यावी. याशिवाय शासन नियमाप्रमाणे १०, २० व ३० वर्षानंतर कालबद्ध पदोन्नती लागू करणे आदी मागण्या निवेदनामार्फत आयुक्तांना करण्यात आलेल्या आहेत.

नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत १९२ संगणक ऑपरेटर्सना सद्यस्थितीत किमान वेतन कायद्यानुसार वेतन दिले जात आहे. मात्र आता मनपाच्या स्थायी समितीमध्ये ऑपरेटर्सना मानधन तत्वावर कार्यरत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयाचा कर्मचा-यांमार्फत निषेध नोंदवून सदर निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.