रेल्वे महाव्यवस्थापकांचे संकेत
नागपूर: मध्यवर्ती नागपूर रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास प्रक्रियेला येणाऱ्या दिवसांमध्ये गती मिळण्याचे संकेत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी आज येथे दिले.
वर्ल्ड क्लासच्या धर्तीवर मध्यवर्ती नागपूर रेल्वेस्थानकाच्या विकासाची पूर्वीच रेल्वेची योजना होती. त्यात देशभरातील निवडण्यात आलेल्या ए – 1 श्रेणीतील रेल्वेस्थानकात नागपूरचाही समावेश करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात बेल्जीयम टीमने यासंदर्भात मध्यवर्ती नागपूर रेल्वेस्थाकाची पाहणीसुध्दा केली. मात्र, पुढे जागेचा अभावामुळे ही प्रक्रिया रखडली. यानंतर भारतीय रेल्वेने स्वतंत्र विभागामार्फत रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाची योजना आखली. त्यातही नागपूर रेल्वेस्थानकाचा समावेश आहे. मात्र, या पुनर्निर्माणकार्यातही जागेच्या अभावाची समस्या प्रकर्षाने पुढे आली. त्यामुळे रेल्वेस्थानकाहून मानस चौकाच्या दिशेन जाताना डाव्या बाजूला भारतीय सेना, मध्यप्रदेश परिवहन महामंडळ, महाराष्टल राज्य परिवहन महामंडळ, मॉडेल स्कुलची जागा आहे. ही जागा अधिग्रहीत करून नागपूर रेल्वेस्थानकाच्या पुर्नविकासाचे मॉडेल तयार करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेचे यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, ही जागा मिळावी यासाठी रेल्वेने गंभीरतेने प्रयत्न सुरू केले आहेत. भारतीय रेल्वे स्टेशन विकास निगम अंतर्गत खासगी भागीदाराच्या मदतीने नागपूर रेल्वेस्थानकाचा मेक ओव्हर होणार आहे. या प्रस्तावाला यापूर्वी केंद्रीय मंत्रालयानेसुद्धा परवानगी दिली आहे. मात्र, बराच काळ लोटूनही प्रकल्प पुढे जाऊ शकला नव्हता. प्रकल्पासाठी ठेवण्यात आलेल्या अटी, शर्थी त्यामागील प्रमुख कारण ठरले. आता मात्र इच्छूकांच्या मागणीप्रमाणे लीजचा अवधी वाढविण्यासह सब लीज देता येऊ शकेल अशा आशयाच्या अटी, शर्थींचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे पुनर्विकासाच्या प्रकल्पाला येणाऱ्या दिवसामध्ये गती मिळू शकेल, असे संकेत शर्मा यांनी दिले.
अजनी रेल्वेस्थानकाचा होणार कायापालट
रेल्वे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा : अजनी लोको शेड भारतातील “बेस्ट’
सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. 16 : सागरमाला प्रकल्पांतर्गत अजनीत मल्टीमॉडल हब विकसित केले जात आहे. या शिवाय रेल्वेकडूनही फलाट व पीटलाईनच्या संख्येत वाढ, वॉशींग लाईनसह अन्य कामे केली जाणार आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये सॅटेलाईन टर्मिन्स स्वरूपात विकास प्रस्तावित असलेल्या अजनी स्थानकाचा कायापालट होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डी. के. शर्मा यांनी गुरुवारी अजनी लोकोशेडला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, अजनी लोकोशेड भारतातील सर्वोत्कृष्ट शेड ठरले आहे. या ठिकाणी पुशपूल तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. येथील इंजिन घाटसेक्शनमध्ये अधिक उपयुक्त ठरत आहे. लोणावळा घाट सेक्शनमधून धावणाऱ्या गाड्यांना हे इंजिन जोडण्यात येत असल्याने रेल्वेगाड्यांचा सरासरी वेग वाढून वेळेची बचत होऊ लागली आहे. नागपूर – पुणे, नागपूर
– नाशिक गाड्यांना येथील इंजिन जोडले जात आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये अन्य गाड्यांनासुद्धा येथील इंजिन जोडले जाणार आहे.
भारतीय रेल्वेने पायाभूत विकासावर भर दिला असून थर्ड व फोर्थलाईनची कामे सुरू आहेत, ऑटोमॅटीक सिग्नलींग, लूपलाईनच्या संख्येत वाढ होत आहे. प्रवासी सुविधासुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. गेल्या 40 वर्षांमध्ये झाली नाहीत तेवढी विकासकामे अलिकडच्या वर्षांमध्ये झाली असल्याचा दावा त्यांनी केला. स्वयंचलित जिने, लिफ्ट, एफओबीची कामे जोरावर सुरू आहेत. प्रवासी सुविधांवर गेल्या वर्षी 300 कोटींचा खर्च झाल्याची माहिती त्यांनी दिली.
ब्रॉडगेज मेट्रोला कोचेसची प्रतीक्षा
ब्रॉडगेज मेट्रोरेल्वे सुरू करण्याच्या दृष्टीने महामेट्रोसोबत करार झाला आहे. त्यानुसार कोचेसची उपलब्धता करून देण्याची जबाबदारी महामेट्रोची आहे. त्यांनी कोसची उपलब्धता करून देताच ब्रॉडगेज मेट्रोसेवा सुरू केली जाईल.
महत्त्वाचे मुद्दे :-
नागपूर- सेवाग्राम थर्ड-फोर्थ लाईनमध्ये भूमी अधिग्रहणाचा खोडा
सेवाग्राम व इटारसी रेल्वेमार्गच्या कामांना प्राधान्य
पुरेसे प्रवासी मिळाल्यास गोवा ट्रेन पुन्हा सुरू होणार
डबे वाढविण्यापेक्षा हॉलीडे स्पेशल चालविण्यावर भर
कमी अंतरासाठी मेमू चालविण्याचा विचार
मेमूशेडसाठी रेल्वे बोर्डला प्रस्ताव सादर
अजनी – काझीपेठ पॅसेंजर लवकरच सुरू होईल