Published On : Mon, Feb 5th, 2018

समृद्ध समाजासाठी ज्ञान तंत्रज्ञाना सोबतच इतिहास व संस्कृतीचे योगदान महत्वाचे

Advertisement


नागपूर: समृद्‌ध समाजाची निर्मिती हा केवळ ज्ञान-तंत्रज्ञान किंवा उद्योगावरच होत नाही तर त्याच्या जडणघडणीमध्ये साहित्य, इतिहास व संस्कृतीचे योगदानही महत्वाचे ठरते, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आणि केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यानी आज नागपूर येथे केले. ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन, नागपूर महानगरपालिका , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व सप्तक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक पर्सिस्टंट कंपनीतील सभागृहात आयोजित तीन दिवसीय ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलच्या (ओसीफ ) समारोपीय कार्यक्रमात विशेष अ‍तिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी ओसीफचे अध्यक्ष व ख्यातनाम दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, आयोजन सचिव डॉ. चंद्रशेखर मेश्राम व जेष्ठ अभिनेत्री श्रीमती रोहिणी हट्टंग़डी उपस्थित होत्या.

यावर्षीच्या प्रारंभी खासदार महोत्सवाच्या माध्यमातून नागपूरकरांना साहित्य , संस्कृती , कला या क्षेत्रातील मातब्बर लोकांच्या कलाविष्कारांचे दर्शन लाभले. आता ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय सिनेमा तसेच भारतीय सिनेमा प्रेक्षकांना बघण्यास मिळत आहे . जुन्या स्मृती जागृत करणारे दर्जेदार मराठी चित्रपट व नव्या पिढीला आवडणारे आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे मिश्रण व त्यावर आधारित परिसंवादसुद्धा अशा चित्रपट महोत्सवात बघायला मिळावे, अशी अपेक्षा गडकरी याप्रसंगी व्यक्त केली. ओसीफचे हे दुसरे वर्ष असून या महोत्सवाला आवश्यक ते सर्व सहकार्य आपण करू. नागपूरच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणा-या पूर्व नागपूरातील कविवर्य सुरेश भट सभागृहातही पुढच्या वेळेला या महोत्सवातील चित्रपट दाखवावेत, असेही त्यांनी सुचविले.


या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी ओसिफ़च्या आयोजनात हातभार लावणा-या विद्यार्थ्यांचा जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंग़डी यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आल. समारोपीय कार्यक्रमानंतर ‘फ्री अ‍ॅंड इजी’ या चीनी चित्रपटाचे प्रदर्शनही करण्यात आले. या कार्यक्रमात पर्सिस्टंट , सप्तक ग्रुपचे , ओसिफ़चे पदाधिकरी व सिनेरसिक उपस्थित होते.