Published On : Wed, Aug 1st, 2018

हिमाचल प्रदेशच्या ग्रामविकास मंत्र्यांनी घेतली पंकजा मुंडे यांची भेट

Advertisement

मुंबई : हिमाचल प्रदेशचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री विरेंद्र कंवर यांनी आज राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन महाराष्ट्रात गावांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती घेतली. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे श्रीमती मुंडे यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. कंवर यांचे स्वागत केले.

यावेळी श्रीमती मुंडे यांनी महाराष्ट्रात ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, अस्मिता योजना, उमेद अभियान, घरकुलाच्या जागेसाठी अनुदान देणारी पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजना, बचतगटांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देणारे सुमतीबाई सुकळीकर महिला उद्योगिनी अभियान, ग्रामीण बेघरांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी शासकीय जागांवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय आदी विविध योजनांची माहिती दिली.

मंत्री श्री. कंवर यावेळी म्हणाले की, महाराष्ट्राने ग्रामविकासविषयक विविध अभिनव योजनांची अंमलबजावणी केली आहे. केंद्राशिवाय स्वनिधीतून महाराष्ट्रात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, अस्मिता योजना यांसारख्या विविध योजना राबविण्यात येत असून या योजना निश्चितच आदर्शवत आहेत.

महाराष्ट्रातील अशा विविध योजनांची हिमाचल प्रदेशमध्ये अंमलबजावणी करु, असे ते म्हणाले. ग्रामविकासाच्या बाबतीत विविध कल्पना, योजना आदींचे महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश राज्यांमध्ये निश्चितच आदान-प्रदान करण्यात येईल, असे यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.