Published On : Sat, Jun 16th, 2018

एसटीची १८ टक्के भाडेवाढ म्हणजे युती सरकारने केलेली लुटमारच!: विखे पाटील

Advertisement

शिर्डी: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे जनता अगोदरच होरपळून निघाली असताना आता इंधन दरवाढीचे कारण सांगून सर्वसामान्य नागरिकांवर लादलेली एसटीची १८ टक्के प्रवासी भाडेवाढ म्हणजे भाजप-शिवसेना सरकारने सुरू केलेली लुटमार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

शनिवारपासून लागू केलेल्या एसटी प्रवासी भाडेवाढीवर संताप व्यक्त करताना विखे पाटील यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले की, पेट्रोल डिझेलची दरवाढ हे केंद्र सरकारचे पाप असून, या दरवाढीचे कारण सांगून शिवसेनेकडे असलेल्या परीवहन विभागाने महाराष्ट्राच्या जनतेवर एसटीची १८ टक्के प्रवासी भाडेवाढ लादली आहे. आजपर्यंत शिवसेना सतत सांगत होती की, सरकारच्या पापांमध्ये आम्ही भागीदार नाही. आम्ही सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम करीत आहोत. पण या दरवाढीमुळे आता शिवसेनेचाही खरा चेहरा समोर आला आहे.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मंत्रिमंडळातील सहभागी पक्ष म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येक पापात शिवसेनाही तेवढीच दोषी आहे. शिवाय सर्वसामान्य एसटी प्रवाशांवर दरवाढ लादून शिवसेनेने आपण जनतेची लुटमार करण्यातही सहभागी असल्याचे सिद्ध केले आहे. शिवसेनेला सर्वसामान्य प्रवाशांचा कळवळा असता आणि ते सरकारच्या पापांमध्ये सामिल नसते तर त्यांनी केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीची सबब सांगून ही भाडेवाढ लादली नसती. किंबहुना परीवहन मंत्र्यांनी इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राजीनामा दिला असता, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.

भाजप सरकारच्या पापांमध्ये शिवसेना सहभागी असल्याचे हे काही पहिलेच उदाहरण नाही. यापूर्वीही अनेकदा भाजपशी त्यांचे आतून असलेले साटेलोटे महाराष्ट्राने अनुभवले आहे. यापुढे शिवसेनेला सरकारच्या कोणत्याही निर्णयाची जबाबदारी झटकता येणार नाही. त्यांनी यापुढे उगाच जनतेप्रती खोटा कळवळा दाखवून सरकारवर टीका करण्याची नौटंकी करू नये. कारण त्यांचा सत्तेसाठी स्वार्थी आणि तेवढाच लाचार झालेला चेहरा या निमित्ताने उघडा पडल्याची बोचरी टीकाही विरोधी पक्षनेत्यांनी केली.

Advertisement
Advertisement