नागपूर : राज्याचे महसूल व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी नागपूर येथील नियोजन भवनात नागरिकांच्या विविध मागण्यांवर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. या प्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पावसामुळे झालेले नुकसान, स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि काँग्रेसच्या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
विदर्भासह राज्यात अनेक भागांत मुसळधार पावसाने थैमान घातले असून, शेतमाल व इतर संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यवृष्टी झाली आहे, तेथे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना व बाधितांना नुकसानभरपाई दिली जाईल.
स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवि चव्हाण आणि मी राज्यातील दौऱ्यादरम्यान महायुतीसोबतच स्थानिक स्वराज्य निवडणुका लढवण्याचे स्पष्ट केले आहे. मात्र जिथे एकत्र येणे शक्य नसेल, तेथेही निवडणुका सौहार्दपूर्ण पद्धतीने पार पडाव्यात आणि महायुतीला कुठलाही तोटा होणार नाही, याची काळजी स्थानिक नेत्यांनी घ्यावी.”
दरम्यान, काँग्रेसकडून भाजपवर करण्यात येणाऱ्या ‘मत चोरी’च्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, “काँग्रेसने आत्ताच मतदार यादीची पडताळणी करावी. कारण स्थानिक स्वराज्य निवडणुका या विधानसभा मतदार याद्यांच्या आधारेच होणार आहेत. त्यामुळे जर काही आक्षेप असतील तर आताच नोंदवावेत. पराभवानंतर पुन्हा मतदार याद्यांवर दोषारोप करून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करू नये.”