नागपूर: ‘हॅलो, आपल्याकडे पाणी नियमित येतोय का, पाण्याचा दाब व्यवस्थित आहे की नाही, पाणी पुरवठ्यात काही अडचण येतेय का?’ अशी आस्थेने विचारपूस करणारे फोन कॉल्स आपल्याला आले तर… ही कल्पना आता प्रत्यक्षात उतरत आहे. नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर (ओसीडब्ल्यू) यांनी यासाठी पुढाकार घेत आउटबाउंड कॉल सेंटर सुरु केले आहे. या कॉल सेंटरवरुन नागरिकांना फोन करुन त्यांच्या समस्या जाणून घेण्यात येत आहेत. या सुविधेला नागपूरकर नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे.
पाण्याची समस्या आली की कुठे तक्रार करायची हा प्रश्न सोडविण्यासाठी मनपा व ओसीडब्ल्यूने इनबाउंड कॉल सेंटर सुरु केले होते. हे सेंटर अजूनही सुरु असून यात जारी केलेल्या संपर्क क्रमांकावर नागरिकांच्या तक्रारी स्वीकारल्या जातात व त्यावर कार्यवाही केली जाते. या 24×7 सेवेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता मनपा व ओसीडब्ल्यूने पुढचे पाऊल टाकीत आउटबाउंड कॉल सेंटरची सेवा सुरु केली आहे.
आउटबाउंड कॉल सेंटरचा मुख्य उद्देश ग्राहकांची मते जाणून घेणे हा आहे. त्यामुळे ओसीडब्ल्यू ला आपल्या सेवांमध्ये सातत्याने सुधारणा करता येते. ग्राहकांकडून पाणीपुरवठा संदर्भात पाण्याची उपलब्धता आणि नियमितता, पाण्याचा दाब म्हणजे योग्य दाबाने पाणी मिळते की नाही, पुरवठ्याची वेळ तसेच कालावधी, पाण्याच्या मीटरशी संबंधित अडचणी, ओसीडब्ल्यू कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबद्दल अभिप्राय, ओसीडब्ल्यूच्या सेवेमध्ये कुठल्या सुधारणा हव्यात या विषयी सूचना अशा विविध मुद्द्यांवर आउटबाउंड कॉल सेंटर वरुन अभिप्राय गोळा केला जातो.
हे सेंटर ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी एक संवेदनशील आणि सहानुभूतीपूर्ण व्यासपीठ म्हणून काम करत आहे. ज्यामुळे ग्राहकांशी असलेले संबंध अधिक दृढ होत आहेत. तसेच, ग्राहकांच्या थेट प्रतिसादातून मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीमुळे सेवेतील कामगिरीत सुधारणा होत आहे.
आउटबाउंड कॉल सुविधेकरिता 35 कर्मचारी कार्यरत आहेत. या सुविधेद्वारे सप्टेंबर 2024 ते मे 2025 पर्यंत सुमारे 2.40 लाख ग्राहकांशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यापैकी 2.22 लाख ग्राहकांनी ओसीडब्ल्यू च्या सेवांबद्दल समाधान व्यक्त केले आहे. काही भागांमध्ये पाण्याचा दाब आणि पुरवठ्याचा कालावधी सुधारण्याबाबत महत्त्वाचा अभिप्रायही प्राप्त झाले आहेत. याव्यतिरिक्त, ग्राहकांनी डिजिटल प्लॅटफॉर्मसारख्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी मौल्यवान सूचनाही दिल्या आहेत.
ग्राहकांकडून मिळालेल्या अभिप्रायावर ओसीडब्ल्यू द्वारे सातत्याने कार्यवाही सुरु आहे. भविष्यात देखील ग्राहकांकरिता उत्तम नवनवीन सुविधांचा समावेश करावा यासाठी प्रयत्न सुरु असून ओसीडब्ल्यू निरंतर ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास कटिबद्ध आहे.
पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करू शकतात.