
नागपूर : नागपूर शहरातील अपघातांचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. ८ सप्टेंबर २०२५ पासून बाह्य वळण रस्त्याच्या आत जड वाहनांना प्रवेशबंदी लागू होणार आहे. केवळ रात्री १० ते सकाळी ६ या वेळेतच जड वाहनांना शहरात प्रवेश दिला जाणार आहे.
वाहतूक विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, २०२० ते २०२५ दरम्यान शहरात जड वाहनांमुळे तब्बल ४२२ प्राणांतिक अपघात झाले असून ४५७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर २७९ गंभीर अपघातांमध्ये ५६३ जण कायमस्वरूपी अपंग झाले तर १८० किरकोळ अपघातांत २४७ जखमी झाले. या पार्श्वभूमीवरच शहरातील जड वाहनांची वर्दळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन आउटर रिंग रोडचा वापर बंधनकारक-
अनेक जड वाहने आउटर रिंग रोड टाळून शहराच्या हद्दीतून जात असल्यामुळे अपघातांची संख्या वाढत होती. त्यामुळे आता सर्व जड वाहनांना नवीन आउटर रिंग रोडचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पोलिस उपायुक्त (वाहतूक) लोहित मतानी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ व मोटर वाहन अधिनियम १९८८ च्या कलमानुसार जारी केलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे की, शहराबाहेरून दुसऱ्या शहरात जाणाऱ्या वाहनांनी कुठल्याही परिस्थितीत नागपूर शहराच्या आत प्रवेश करू नये.
कोणत्या मार्गाने कोणती वाहने जातील?
वाहतूक विभागाने वाहनांसाठी पर्यायी मार्गांची रूपरेषा ठरवली आहे –
- अमरावती–जबलपूरकडे जाणारी जड वाहने : गोंडखैरी टी-पॉईंटवरून अंडरपासमार्गे खडका टोल नाका – झिरो समृद्धी सर्कल – पांजरा टोलमार्गे पुढे.
- अमरावती–वर्धा/चंद्रपूर/हैद्रा
बादकडे जाणारी वाहने : आउटर रिंग रोडने वर्धा रोडवर डावे वळण घेऊन पुढे. - वर्धा–भंडारा/रायपूर/कोलकात्या
कडे जाणारी वाहने : रानीकोठी कटिंगमार्गे आउटर रिंग रोड. - भोपाळ/छिंदवाड्याकडे जाणारी वाहने : गोंडखैरी टी-पॉईंटवरून कोराडी पॉवर हाऊसमार्गे आउटर रिंग रोड.
- भोपाळ/छिंदवाडा/बैतूलहून उमरेड–भंडारा–रायपूरकडे जाणारी वाहने : कोराडी पॉवरहाऊसमार्गे कापसी पुलीया – कामठी-कन्हान मार्गे.
काही वाहनांना वेळेची मर्यादा
शहरातील काही महत्त्वाच्या दळणवळणाच्या ठिकाणी येणाऱ्या जड वाहनांना देखील सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत प्रवेशबंदी राहील. यात –
- अजनीतील भारतीय खाद्य निगम (FCI) गोदाम,
- रेल्वे मालधक्का व संत्रा मार्केट,
- कामठी रोडवरील लालगोदाम यांचा समावेश आहे.
या वाहनांना ठरवून दिलेल्या मार्गानेच शहरात प्रवेश मिळेल आणि त्यांचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळावे लागेल.
नागरिक व चालकांना आवाहन-
वाहतूक विभागाने या निर्णयाची माहिती सर्व वाहनचालक आणि नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी माध्यमांना आवाहन केले आहे. ७ सप्टेंबरपर्यंत या निर्णयाला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी, असे सांगण्यात आले आहे.