Published On : Tue, Sep 28th, 2021

कळमना ते कामठी मार्गावर दिवसभर जड वाहतूक

– रेती, गिट्टी, कोळशाची वाहतूक

नागपूर: राष्ट्रीय महामार्ग कामठीचा कायापालट होत आहे. सिमेंटीकरणाला गती मिळाल्याने चकाचक अन् गुळगुळीत रस्ते होत आहेत. तर दुसरीकडे मोजक्या मार्गावर जड वाहनांची रांग असते. रेती, गिट्टी, कोळसा, ऑईल, ग्रीस, धुळ आणि किचड असतो. त्यामुळे दुचाकीवाहन चालकांना आपला जीव मुठीत घेवून मार्गक्रम करावा लागत आहे. ही स्थिती आहे, कळमना ते कामठी आणि खैरी ते कामठी यामार्गाची.

नागपूर – जबलपूर हा राष्ट्रीय मार्ग अतिवर्दळीचा आहे. राष्ट्रीय महामार्गासाठी नियमावली सुध्दा आहे. मात्र, नियमांचे उल्लघन करून या मार्गाने मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जाते. त्याच प्रमाणे कळमना मार्गाने कामठीला जाणारा मार्ग सुध्दा अतिव्यस्त झाला आहे. या मार्गाने चोविस तास जड वाहतूक होते. पायी आणि दुचाकी वाहनचालकांना रस्त्याने जाने कठीण झाले आहे.

रेती, गिट्टी, कोळसा वाहतूकीने प्रदूषणाचेही प्रमाण वाढत आहे. याशिवया अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहिती नुसार कळमना – कामठी या मार्गावर गेल्या दिड वर्षात अपघाती मृत्यू १० च्यावर झालेत.
जड वाहतूकीची वेळ आणि वेग मर्यादा ठरवून दिलेली आहे. मात्र, या मर्यादेचे पालन होताना दिसत नाही. परिणामी प्रदूषण आणि अपघात वाढले. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतूक पोलिसांची जबाबदारी वाढली आहे. वाहतूक पोलिस असतानाही जड वाहतूक सुरू असते, यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वाहतूक पोलिसांना निवेदन
रेती, गिट्टी, कोळसा वाहतूक आणि वाढते प्रदूषणासंदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाचे नागपूर जिल्हा संपर्क प्रमुख नफीस शेख यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी तसेच कामठी आणि इंदोरा वाहतूक पोलिस निरीक्षकांची भेट घेवून निवेदन सादर केले. नागपुर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर उत्पलवाडी ते कन्हान मार्गावर धुळ असते. भिलगाव, खैरी, येरखडा, कळमना या मार्गावर हवा अतिप्रदुषित झाल्याची गांभीर्य पटवून सांगितले.