नागपूर :विदर्भात मान्सूनच्या संथ गतीमुळे शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, विदर्भात जोरदार पावसासाठी किमान आणखी एक आठवडा वाट पाहावी लागणार आहे. बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांची तीव्रता कमी झाल्यामुळे पावसाचा जोर थांबला आहे.
मान्सूनचा वेग मंदावला-
जूनच्या पहिल्या आठवड्यात विदर्भात हलकासा पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर मान्सूनाची गती थंडावली आहे. बंगालच्या उपसागरात सध्या कोणतेही सक्रिय हवामान प्रणाली तयार होत नाहीये, तर अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांमध्येही कमकुवतपणा आढळून आला आहे. परिणामी, ढगांची घनता आणि पर्जन्यमान कमी झाले आहे.
काही ठिकाणी हलका पाऊस, पण मुसळधार शक्यता नाही-
नागपूर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ५ ते ७ दिवसांमध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र मुसळधार पावसाची शक्यता सध्या तरी नाही.
IMD नागपूरचे वरिष्ठ हवामानतज्ज्ञ म्हणाले, “बंगालच्या उपसागरात नव्या लो प्रेशर सिस्टिमच्या निर्मितीची शक्यता पुढील काही दिवसांत आहे. जर ही प्रणाली सक्रीय झाली, तर मान्सून वेग पकडेल आणि विदर्भात मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता असेल.”
बोंडाई अडकल्याने शेतकरी चिंतेत-
खरीप हंगामाच्या पेरणीसाठी आवश्यक असलेल्या सततच्या पावसाची प्रतीक्षा अजूनही सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेताची तयारी पूर्ण केली आहे, मात्र पावसाअभावी पेरणीला सुरुवात करता आलेली नाही. विदर्भात कपाशी, सोयाबीन, तूर यांसारख्या मुख्य पिकांची पेरणी जून अखेरपर्यंत केली जाते. पावसाच्या विलंबामुळे शेतीच्या चक्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, मुसळधार पाऊस झाल्यानंतरच पेरणीस सुरुवात करावी.
उकाड्याने नागरिक त्रस्त-
पावसाअभावी आणि ढगांच्या अनुपस्थितीत विदर्भातील अनेक शहरांमध्ये दिवसाचे तापमान वाढले असून रात्री उकाड्याची तीव्रता जाणवत आहे. नागपूर आणि चंद्रपूर येथे तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.