नागपूर : भारतीय हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यात ७ ते ९ जुलै २०२५ दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यासोबतच मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली असून आज ८ जुलैसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी घरातच थांबावे, विजा चमकत असताना मोबाईलचा वापर करू नये आणि घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावीत, असे आवाहन केले आहे. तसेच पावसात झाडाखाली उभं राहणे टाळावं, शेतात काम करताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा आणि जलपर्यटन स्थळांवर जीव धोक्यात घालणारे प्रकार करू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
नदी, नाले आणि पुलांवरून पाणी वाहत असल्यास अशा ठिकाणी चालत किंवा वाहनातून जाण्याचा प्रयत्न न करण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे. नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेऊन स्वतःसह कुटुंबीयांची काळजी घ्यावी व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांनी केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत संपर्कासाठी जिल्हा नियंत्रण कक्षाचा क्रमांक : ०७१२-२५६२६६८.