Published On : Fri, Jul 6th, 2018

नागपूरसह विदर्भात पावसाची दमदार बॅटिंग

नागपूर : विदर्भात गेल्या काही दिवसांपासून अदृश्य झालेल्या पावसाने काल रात्रीपासून दमदार हजेरी लावली आहे. काल रात्री ९ वाजल्यापासून नागपूरसह संपूर्ण विदर्भात पावसाची संततधार सुरु असून, यामुळे विदर्भातील शेतकरी सुखावला आहे.

गेल्या २० दिवसांपासून विदर्भात पावसाने दडी मारली होती. सुरुवातीला झालेल्या पावसानंतर विदर्भातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पिकांची पेरणीही उरकलेली होती. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची संकट ओढवलेले होते.

मात्र कालपासून सुरु झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून त्यांच्यावर असलेले दुबार पेरणीचे संकट टळले आहे. काल रात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळे नागपूर शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याच दृश्य बघायला मिळत आहे. त्यातच नागपुरात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने आज सकाळपासून नागपूरकरांना काही भागात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.