Published On : Fri, Oct 9th, 2020

सकस आहार, नियमित व्यायाम, पुरेसे पाणी; फुफ्फुस संरक्षणाची त्रिसूत्री

Advertisement

‘कोव्हिड संवाद’मध्ये डॉ.मीना देशमुख आणि डॉ.आदित्य परिहार यांचा सल्ला

नागपूर : कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका फुफ्फुसाला आहे. त्यामुळेच शरीराच्या या अवयवाची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. ज्याप्रमाणे सॅनिटाजर, मास्क आणि शारीरिक अंतर यांचे पालन करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे फुफ्फुसांच्या संरक्षणासाठी सकस आहार, नियमित व्यायाम आणि पुरेसे पाणी पिणे ही त्रिसूत्री देखील तितकीच महत्वाची आहे, असा सल्ला प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ तथा राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या (ई.एस.आय.एस.) वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीना देशमुख आणि प्रसिद्ध दमा व छातीरोग विशेषज्ज्ञ (ई.एस.आय.एस.) डॉ.आदित्य परिहार यांनी दिला.

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतील ‘कोव्हिड संवाद’ फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात शुक्रवारी (ता.९) ते‘फुफ्फुसाचे आजार आणि कोव्हिड’ या विषयावर बोलत होते. यावेळी नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांनी शंकांचे निरसरन केले.

लॉकडाउननंतर आता सर्व अनलॉक होत आहे. या काळात सर्व दुकाने, आस्थापना, औद्योगिक कारखाने, थर्मल पॉवर प्लांट्स आदी सुरू झाल्याने प्रदुषणाचे प्रमाण वाढले आणि कोरोनाचा धोका सुद्धा. जुना दमा, क्षय, अस्थमा, सीओपीडी, लंग्स फायब्रोसिस, फुफ्फुसामधील होणा-या बिघाडामुळे होणारा उच्च रक्तदाब यासोबतच ५५ वर्षावरील व्यक्ती ज्यांना रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा, मुत्रपिंड, यकृताचे आजार आहेत अशांना कोरोनाचा आजार होण्याची जोखिम जास्त आहे. कोरोना हा शरीरातील सर्वच अवयवांवर प्रहार करतो मात्र यात सर्वाधिक धोका हा फुफ्फुसाला असतो.

आधीच फुफ्फुसाचा त्रास असलेल्यांसाठी तो तीव्र जोखिम ठरू शकतो. कोरोनावर कुठलीही लस सध्या उपलब्ध नसल्याने सुरक्षा हाच त्यापासूनचा बचाव आहे. यासाठी पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यास किंवा कुठलीही सौम्य लक्षणे जाणवल्यास त्वरीत चाचणी करणे अत्यावश्यक आहे. चाचणीसाठी आता नागपूर महानगरपालिकेने व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल केले आहे. अँटीजेन आणि आरटीपीसीआर चाचण्यांसाठी मनपाचे केंद्र आणि ‘आपली बस’मधील फिरते केंद्र अशी सुमारे ६० चाचणी केंद्र कार्यरत आहेत. त्यामुळे घाबरून न जाता प्रत्येकाने चाचणीसाठी पुढे यावे. लवकर निदान, त्वरीत उपचार हा कोरोनापासून बचावाचा मंत्र प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची गरज आहे, असे आवाहनही डॉ.मीना देशमुख आणि डॉ.आदित्य परिहार यांनी केले.

फुफ्फुसासंबंधी आजार असल्यास आणि त्याचे उपचार सुरू असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इतर कुठलीही औषधे घेउ नये. फुफ्फुसाचे आजार असणारे रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिक या सर्वांनीच सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दररोज सकस आहार घ्या. ताजी फळे खा, आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा, लिंबूवर्गीय फळे लिंबू, आवळा, संत्री, मोसंबी यासह दुध, दही, आले, लसून, अंडी, चिकन चा आहारात समावेश करा. तेलकट पदार्थ, जंकफूड, मैद्याची पदार्थ खाणे कटाक्षाने टाळा.

यासोबतच शरीराला पुरेशे प्राणवायू मिळावे यासाठी नियमित व्यायाम करा. फुफ्फुसाशी संबंधित व्यायाम सुद्धा करा. कोरोनाचा विषाणू फुफ्फुसावर प्रहार करीत असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होउन धोका आणखी वाढू नये यासाठी दररोज आठ ते दहा ग्लास पाणी प्या. सुरक्षेच्या दृष्टीने सॅनिटाजर, मास्क, शारीरिक अंतर (सोशल डिस्टंसिंग) ‘एसएमएस’ची ही त्रिसूत्री जेवढी महत्वाची आहे. तेवढीच सकस आहार, नियमित व्यायाम आणि पुरेसे पाणी ही त्रिसूची फुफ्फुसाच्या आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी महत्वाची आहे, असा संदेशही डॉ.मीना देशमुख आणि डॉ.आदित्य परिहार यांनी दिला.