Published On : Mon, Jun 4th, 2018

आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा राजीनामा

Advertisement

मुंबई : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून पत्ता कट केल्यानंतर आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा थांबवण्याचा सल्ला दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी दीपक सावंत यांना उद्याच्या कॅबिनेट बैठकीलाही हजर रहायला सांगितलं आहे. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तर त्याअगोदर ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सुपूर्द केला.

शिवसेनेकडून विलास पोतनीस यांना उमेदवारी

कॅबिनेट मंत्री दीपक सावंत यांचा पत्ता कट करत ते सध्या आमदार असलेल्या मुंबई पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी शिवसेनेकडून विलास पोतनीस यांना देण्यात आली आहे. विलास पोतनीस हे सध्या बोरीवलीचे विभाग प्रमुख आहेत.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम

नाशिक शिक्षक मतदारसंघ, मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ आणि कोकण विभागातून पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ सात जुलै रोजी संपत आहे. यासाठी 25 जून रोजी मतदान होईल, तर 28 जून रोजी निकाल आहे.

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख सात जून आहे, तर अर्ज 11 जूनपर्यंत मागे घेता येणार आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे विद्यामन आमदार

नाशिक शिक्षक मतदारसंघ : डॉ. अपूर्व हिरे

मुंबई शिक्षक मतदारसंघ : कपिल पाटील

मुंबई पदवीधर मतदारसंघ : डॉ. दीपक सावंत

कोकण पदवीधर मतदारसंघ : निरंजन डावखरे