नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या स्थापनेला यावर्षी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने आरोग्य विभागाद्वारे मनपामध्ये कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांकरिता सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत आतापर्यंत धरमपेठ झोनमधील डिक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, दाभा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, तेलंगखेडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, हनुमान नगर झोन अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. राजेश बल्लाळ, धरमपेठ झोनच्या झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा देवस्थळे, डिक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना जैस्वाल, डॉ. आकाश, डॉ. वैष्णवी, डॉ. श्रेयस, अधिपरिचारिका श्रीमती दिपाली नागरे आदी उपस्थित होते.
आरोग्य तपासणी शिबिरामध्ये मुख कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाब, नेत्र तपासणी यासह अन्य आरोग्य तपासणी करून पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मनपाच्या मलेरिया व फायलेरिया विभागाच्या चमूने डासजन्य आजारांच्या संसर्गापासून बचावाबाबत जनजागृती केली. नागपूर शहरातील एचसीजी हॉस्पिटलचे डॉ. कमलजीत व त्यांच्या चमुद्वारे मुख कर्करोग, गर्भाशय कर्करोग आणि स्तन कर्करोग या तपासण्या केल्या. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सबनीस यांनी गर्भाशय आणि स्तन कर्करोगाची तपासणी केली. डॉ. बल्लाळ यांनी मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासह अन्य तपासणी केली. मेयो रुग्णालयातील नेत्ररोग तज्ज्ञांनी नेत्ररोग तपासणी केली. मनपा इंदिरा गांधी रुग्णालयाची चमू देखील शिबिरामध्ये सहभागी झाली. एचएलएल लॅब द्वारे रक्त तपासणीसाठी सहकार्य करण्यात आले.
आतापर्यंत विविध नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये झालेल्या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये ५०० पेक्षा अधिक पुरुष व महिला सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून तपासणी करून घेतली. याशिवाय परिसरातील नागरिकांची देखील आरोग्य तपासणी करण्यात आली.