Published On : Wed, Nov 11th, 2020

आरोग्य सेवकांची माहिती आतापर्यंत सादर नाही

खाजगी रुग्णालयांना माहिती दिवाळी पूर्वी देण्याचे निर्देश

नागपूर : केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून कोव्हिड-१९ वर नियंत्रण करण्यासाठी लस तयार करण्याबाबत वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. कोव्हिडची लस तयार झाल्यानंतर सर्वप्रथम आरोग्य सेवक, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना देण्यासाठी त्यांची संपूर्ण माहिती घेउन त्याचा डेटाबेस तयार करण्याचे कार्य नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे. यासंदर्भात केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे. तरीसुध्दा अनेक खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्याकडे कार्य करणारे आरोग्य सेवकांची माहिती विहित नमून्यात सादर नाही केली आहे. शासनाच्या आदेशानुसार मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शहरातील सर्वच रुग्णालय, इस्पितळे, दवाखान्यांना माहिती दिवाळीच्या पूर्वी सादर करण्यासाठी आवाहन केले आहे.

यासंबंधी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की, नागपुरातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयांची माहिती केंद्र आणि राज्य सरकारला संकलीत करून सादर करायची आहे. ही माहिती लवकरात लवकर शासनाकडे पाठवायचे असून सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे सेवा देत असलेले आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती महानगरपालिकेद्वारे विहीत नमून्यात सादर करावी. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल, सामुदायिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुष रुग्णालये, महानगरपालिकेचे दवाखाने, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, खाजगी कॉर्पोरेट हॉस्पिटल, खाजगी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नर्सिंग होम यांच्यासह शहरातील सर्वच नोंदणीकृत व अन्य रुग्णालयांनी सुद्धा आपली माहिती सादर करणे अनिवार्य आहे. यासंबंधी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शहरातील सर्वच रुग्णालय, इस्पितळे, दवाखान्यांना ऑक्टोंबर मध्ये पत्र दिले आहे. त्यानुसार सर्व रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय व्यावसायिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती homnmc.ngp@gmail.com या मेलवर लवकर सादर करायची होती तरीसुध्दा आतापर्यंत ६४० रुग्णालयामधून फक्त १८० रुग्णालयांनी ९५५० कर्मचा-यांच्या डेटा दिला आहे. ४६० रुग्णालयांनी आतापर्यंत माहिती सादर केली नाही. माहिती जर वेळेवर दिल्या गेली नाही तर उरलेल्या आरोग्य सेवकांना कोरोनाची लस मिळण्यात विलंब होऊ शकते. त्यांनी सांगितले की विभागीय आयुक्तांनी सुध्दा ऑनलाईन मिटिंगच्या माध्यमाने डॉक्टर्स संगठनांशी चर्चा करुन त्यांना आरोग्य सेवकांची माहिती सादर करण्याबाबत सांगितले होते. आयुर्वेद, होमियोपॅथी, यूनानी पॅथीचे डॉक्टरांनी सुध्दा माहिती दयावी. जेणेकरुन त्यांना लस उपलब्ध करुन देणे सोयीचे होईल. या बैठकीत मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी सुध्दा उपस्थित होते.

श्री जोशी यांनी सांगितले की, रुग्णालयांनी माहिती पाठविताना ‘डाटा कलेक्शन टेम्प्लेट’नुसार माहिती तयार करावी लागणार आहे.

उदा.COVIDVACC_IMPORTBENEFICIARIES_STATE_UT_NAGPUR_NAGPURCOPORATION_HOSPITALNAME.XLSX अशी लिंक जयार करून माहिती तयार करावी. यासंबंधी नोडल अधिकारी म्हणून डॉ.प्रवीण गंटावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुग्णालयांना माहिती पाठविताना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होत असल्यास त्यांनी नोडल अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार यांच्याशी संपर्क साधावा.

माहिती तयार करताना कटाक्षाने पाळायचे मुद्दे
– माहिती मनपाद्वारे पाठविण्यात आलेल्या आदेशासह दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार ‘एक्सेलशीट फाईल नेम’(Excel Sheet File Name) मध्येच पाठवावी

– ‘एक्सेलशीट फाईल नेम’ दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसारच असावा

– आपल्या संस्थेची माहिती व संस्थेअंतर्गत असणाऱ्या खाजगी संस्थांची माहिती स्वतंत्र ‘एक्सेलशीट’मध्ये तयार करावी

– माहितीसाठी ‘टाईम्स न्यू रोमन’ (Times New Roman) हे फाँट वापरावे व फाँट साईज १२ मध्येच माहिती तयार करावी

– दिलेल्या ‘एक्सेलशीट’मध्ये कोणतेही बदल करू नये