नागपूर: शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत अनुदान वितरण व यंत्रणेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणेसंदर्भात नागपूर महानगरपालिकेच्या तवीने मंगळवारी (ता.२९) महाल येथील राजे रघुजी भोसले नेताजी नगर भवन येथे शाळा मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
नागपूर महानगरपालिकेच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनात आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, ग्रीन व्हिजीलचे कौस्तभ चॅटर्जी, जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी श्री. कोहर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यशाळेत शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी प्रास्ताविकातून शालेय पोषण आहार योजनेतील सुधारणांसंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुढील शैक्षणिक सत्राच्या नियोजनासंदर्भातही त्यांनी मार्गदर्शन केले. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांनी पर्यावरणविषयक मार्गदर्शन केले. प्लास्टिकचा वापर कमीत कमी करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने ५ जून रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत प्रत्येक शाळेतून किमान पाच विद्यार्थी पाठविण्याचे आवाहन त्यांनी मुख्याध्यापकांना केले.
कार्यशाळेचे संचालन सहायक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती प्रीती बंडेवार यांनी केले. कार्यशाळेच्या आयोजनासाठी संध्या पवार, दिलीप वाखतकर, श्री. टेंभुर्णे आदींनी सहकार्य केले.
