नागपूर – शहरातील सदर भागात एका खासगी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा बाथरूममध्ये आंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवून तिचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मैत्रीसाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, एवढ्यावरच न थांबता त्याने तिचा पाठलाग करत तिला जीव मारण्याची आणि चेहऱ्यावर अॅसिड फेकण्याची धमकी दिली. अखेर पीडित मुलीने पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर सदर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
अश्विन दासर विरोधात गुन्हा दाखल-
प्राप्त माहितीनुसार, आरोपीचे नाव अश्विन दासर असून तो सदर भागातीलच राहणारा आहे. पीडित विद्यार्थिनी सदर भागात एका घरात भाड्याने राहत होती. त्या घराच्या मालकीण महिलेचा भाचाच अश्विन असून तो नेहमी त्या घरी येत असे. त्याच दरम्यान, अश्विनने लपून तिचा आंघोळीचा व्हिडीओ मोबाइलवर शूट केला. नंतर तो व्हिडीओ दाखवून तिच्यावर मैत्रीसाठी दबाव टाकू लागला.
या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने भाड्याचा रुम सोडून होस्टेलमध्ये रहायला सुरुवात केली. मात्र आरोपी तिथेही तिचा पाठलाग करत होता. बुधवारी त्याने तिला रस्त्यात अडवून धमकी दिली की, “तू जर माझं ऐकलं नाहीस तर तुझ्या चेहऱ्यावर अॅसिड फेकून तुला मारून टाकीन.”
१५ तासांत चार्जशीट दाखल-
विद्यार्थिनीने तात्काळ सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर प्रकरणाच्या गंभीरतेची दखल घेत पोलीस निरीक्षक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संतोष शिरडोले यांनी तत्काळ कारवाई केली. केवळ १५ तासांत आरोपीविरोधात न्यायालयात चार्जशीट दाखल करून त्याला हजर करण्यात आले.
गुन्हेगारी कलमे लावून अटक-
पोलिसांनी संबंधित आरोपीवर भारतीय दंड विधानातील विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. अशा घटनांमुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी समाजातून होऊ लागली आहे.