नागपूर: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांनी विधानभवनात येणाऱ्यांची अंगझडती घेत खिशातील तंबाखू ,खर्रा, गुटखा, मावा यासारखे तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. त्यामुळे तांबाखू खाणाऱ्यांना मोठा फटका बसला.
विधिमंडळाच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्यास मनाई आहे. असे असतांनाही विधान भवनात येणारे नेते, अधिकारी, कर्मचारी, आणि लोक तंबाखूजन्य पदार्थ दडवून आणत होते. व ते खाऊन कुठेही थुंकत होते. ही बाब सुरक्षा यंत्रणांच्या लक्षात येतं त्यांनी कडक कारवाई उचलून अश्या पदार्थांची जप्ती करण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रवेशद्वारावरच येणाऱ्यांची झडती घेत त्यांच्या खिशातील तंबाखूजन्य पदार्थ बाहेर काढून बाजूच्या ट्रेमध्ये ठेवण्यास सांगितले. यावेळी शेकडो खर्रे, गुटखे जमा झाल्याचे दिसून आले. ही कारवाई अधिवेशन काळापर्यंत राहणार आहे. मात्र या कारवाईचा फटका शौकिनांना बसला आहे. आता शौकिनांना आपली तलफ चहावर भागवावी लागणार आहे.