Published On : Fri, Aug 23rd, 2019

‘इनोव्हेशन पर्व’ विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक- डॉ. परिणय फुके

नागपूर-: विद्यार्थी –विद्यार्थिनी आणि युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी इनोव्हेशन पर्व हे दिशादर्शक आहे. शहराच्या शाश्वत विकासासाठी महापौर नंदा जिचकार युवकांना दिशा देण्याचे काम करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.

नागपूर महानगरपालिका आणि मेयर इनोव्हेशन कौन्सीलच्या वतीने आयोजित इनोव्हेशन पर्वाचे मानकापूर इनडोअर स्टेडीयममध्ये दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, गिरीश व्यास, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विकी कुकरेजा, मनपाचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, स्मार्ट सिटीचे सीईओ रामनाथ सोनवणे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी,अतिरिक्त आयुक्त अजिझ शेख, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित उपस्थित होते.

विद्यार्थी युवकांनी परिस्थितीतून कितीही प्रतिकुल असली तरी स्वत:चा आत्म‍विश्वास दृढ ठेवून मार्गक्रमण केले पाहीजे. अनुभव हाच आपला गुरु आहे. अनुभवातून मिळणारे ज्ञान आणि विश्वास कुठेही मिळत नाही. त्यामुळे जगात अनेकांनी आत्मविश्वासाच्या बळावर प्रतिकुल परिस्थितीवर मात करत नाविन्याचा अविष्कार केला आहे. त्यामुळे ते जागतिक पातळीवर चमकले आहे. युववर्गात नाविन्याचा शोध घेणे, नवनवे अविष्कार करणे आणि यातून समाजाला उपयोगी पडेल असे कार्य करणे शक्य आहे. ती क्षमता आणि ऊर्जा महाविद्यालयीन युवकांमध्ये आहे. हे ओळखून महापौर नंदा जिचकार यांनी या इनोव्हेशन पर्वाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमातून युवकांनी नवनव्या संकल्पना घेऊन जावे. त्यातून नवनवे प्रयोग करुन समाजोपयोगी तंत्र विकसीत होईल, असा आशावादही सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री परिणय फुके यांनी व्यक्त केला.

शहराच्या शाश्वत विकासासाठी उपयुक्त ठरतील अशा विद्यार्थी आणि नागरिकांच्या नवनव्या संकल्पनांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम आणि उत्तम कल्पनांना स्टार्ट अप देत उद्योग उभारणी करण्याचे काम यातून होणार आहे. आतापर्यंत इनोव्हेशन पर्वात नवनव्या संकल्पनांचे सादरीकरण करण्यासाठी हजारावर नोंदणी झाली असल्याचेही यावेळी परिणय फु के यांनी सांगितले.

मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल परिसरात सुरु असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध विभागाचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत.