Published On : Thu, Mar 15th, 2018

गुढीपाडवा विशेष: नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईची लगबग!


हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, अर्थातच गुढीपाडवा. या हिंदू नववर्षाचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात आणि शोभा यात्रांच्या जल्लोषात साजरा करण्याची पद्धत गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे. यंदाचे वर्षही त्याला अपवाद नाही. शहर आणि उपनगरांत विविध संस्था व संघटनांनी रविवारी रविवारी (दि. 18) गुढीपाडव्याच्या निमित्ताने नववर्ष स्वागत यात्रांचे आयोजन केले आहे. यंदाच्या वर्षी शके 1940 विलंबी संवत्सर असून, 17 मे ते 13 जूनदरम्यान अधिक ज्येष्ठ महिना असल्याने नववर्ष १३ महिन्यांचे आहे.

‘ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्यावर सृष्टीला चालना दिली तो पहिला दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस समजला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक, त्यामुळे नवीन उद्योग, व्‍यवसायाचा शुभारंभ करण्‍यास हा उत्‍तम मुहूर्त समजला जातो.

आपली कालगणना हजारो वर्षे जुनी आहे. ग्रहांवर आधारित असलेली ही कालगणना पंचांगाच्‍या माध्‍यमातून आपल्‍याला कळते म्‍हणून संवत्‍सरारंभाच्‍या दिवशी गुढीबरोबर पंचांगावरील गणपतीचे पूजन करावे. सकाळी लवकर गुढी उभी करून सूर्यास्‍ताच्‍या दरम्‍यान नमस्‍कार करून ती पुन्‍हा उतरवून ठेवावी. त्‍यासाठी स्‍वतंत्र मुहूर्ताची वेळ, राहू, काल इत्‍यादींचा संबंध नाही. यंदा 16 मे पासून अधिक महिना असल्‍याने विवाह मुहूर्त नाहीत.

मांगल्याचे प्रतीक गुढी
गुढी उभी करण्यासाठी आपण जी काठी वापरणार आहोत, ती स्वच्छ धुवून, पुसून घ्यावी. त्याला रेशमी वस्त्र बांधून त्यावर एखादे चांदीचे भांडे किंवा घरातील कोणतेही स्वच्छ भांडे ठेवावे. गुढीला कडुनिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या बांधाव्यात, साखरेची माळ घालावी. जिथे गुढी उभी करावयाची आहे ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. अंघोळ करून त्या जागी गुढी बांधावी व हळद, कुंकू, फुले वाहून तिची पूजा करावी.

नववर्षातील नवलाई
गेल्‍या वर्षी गणपतीस निरोप देताना पुढच्‍या वर्षी लवकर असा जरी निरोप दिला असला तरी या वर्षी गणपती बाप्‍पा थोडे उशीरा म्‍हणजे 13 सप्‍टेंबर रोजी येणार आहेत आणि 23 सप्‍टेंबरला अनंत चतुर्दशी आहो.

दिवाळी: नोव्‍हेंबर 6, 7, 8 व 9 अस चार दिवस दिवाळी आहे. या वर्षामध्‍ये 2 चंद्रग्रहणे आणि 3 सूर्यग्रहणे अशी एकूण 5 ग्रहणे आहेत. पण 27 जुलैचे चंद्रग्रहण वगळता इतर ग्रहणे भारतात दिसणार नसल्‍याने त्‍याचे वेधादी यिम पाळण्‍याची आवश्‍यकता नाही.

सामाजिक संकल्पाद्वारे कृतिधोरणांची उभारा गुढी
वन्यजीव, पर्यावरण संवर्धन- संरक्षण, पाणी बचत, स्थानिक प्रजातींचे वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, इंधन बचत यासह इतर अनेक सामाजिक संकल्पना राबवण्याचा संकल्प व कृतिधोरणाचा मुहूर्त गुढीपाडव्यापासून करीत प्रत्येकाने सहभागी व्हावे.

यंदा मान्सून सरासरी गाठेल
यंदाच्यावर्षी मान्सून सरासरी गाठेल. पण १५ जुलै ते ऑगस्ट अखेरपर्यंत पावसाचे नक्षत्र आेढ धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये उपलब्ध पाणी, मान्सूनचा अंदाज पाहून पीक नियोजन करणे हिताचे ठरेल.