सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांचा आरोप : लोकप्रतिनिधींचा नियोजित जनजागृती कार्यक्रम रद्द

नागपूर : कोव्हिड-१९ चा संकटकाळात शासनासोबत या शहरातील सर्व लोकप्रतिनिधी आपआपल्या परीने यंत्रणेसोबत आहे. पुन्हा लॉकडाऊन लावावा की नाही असे मत-मतांतरे सुरू असताना सर्व लोकप्रतिनिधींनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बसून भूमिका ठरविली. दोन दिवसांचा जनता कर्फ्यू यशस्वी होणे म्हणजे जनतेला लॉकडाऊन नको आहे- असा त्याचा अर्थ आहे. यासाठी सर्व लोकप्रतिनिधी नागरिकांमध्ये जाऊन जनजागृती करणार होते. मात्र या सर्व विषयावर पालकमंत्री नितीन राऊत ह्यांनी घेतलेली भूमिका ही लोकप्रतिनिधींच्या अधिकाराचे हनन करणारी आहे. याचा निषेध व्यक्त करीत लोकप्रतिनिधींचा नियोजित जनजागृती दौरा रद्द करण्यात येत असल्याचे नागपूर महानगरपालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी सांगितले.
नागपुरात लॉकडाऊनचा निर्णय प्रशासकीय अधिकारी आणि त्यांची समिती घेईल, असे वक्तव्य पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी केले. हे वक्तव्य अत्यंत दुर्देवी असून ज्या शहरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधींना निवडून दिले आहे, त्या लोकप्रतिनिधींचा हा अपमान असल्याचे संदीप जाधव यांनी म्हटले आहे. ते म्हणतात, लोकप्रतिनिधी हा जनतेचा प्रतिनिधी असतो. जनतेच्या भावना शासनापर्यंत पोहचविण्याचे आणि त्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडण्याचे कार्य लोकप्रतिनिधी करीत असतात. त्यामुळे संकटकाळात जनतेच्या भल्यासाठी घेतल्या जाणाऱ्या निर्णयात लोकप्रतिनिधींचाही सहभाग असायलाच हवा. गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात पुन्हा लॉकडाऊन लागेल अथवा नाही यावर चर्चा सुरू असताना वेळोवेळी पुन्हा १४ दिवसांचा कर्फ्यू लावण्यात येईल, असा अल्टीमेटम प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. यामुळे संपूर्ण नागपुरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. आधीच तीन महिन्याच्या लॉकडाऊनमुळे हवालदिल झालेल्या नागरिकांना पुन्हा लॉकडाऊन नको आहे. मग पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी नियम पाळायला हवे, याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.
महापौर संदीप जोशी यांच्या पुढाकाराने या विषयावर चर्चा करण्यासाठी नुकतीच या शहरातील खासदार, आमदार, मनपा पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत लॉकडाऊन करण्याऐवजी जनजागृतीवर भर देण्यात आला. ‘जनता कर्फ्यू’च्या निमित्ताने लिटमस टेस्ट घेण्यात आली. यात नागरिक उत्तीर्ण झाले. २७ ते ३० जुलै दरम्यान सर्व लोकप्रतिनिधी नागरिकांमध्ये जाऊन जनजागृती करणार होते. नागरिकांचीही याला संमती होती. असे असताना पालकमंत्र्यांनी दुर्देवी वक्तव्य करून सर्वांचा भ्रमनिरास केला.
जर हे सर्व पालकमंत्री आणि प्रशासकीय यंत्रणाच करणार असेल तर आम्हाला फिरण्याची गरज नाही, हे यातून स्पष्ट होते. यापुढे त्यांनीच सर्व निर्णय घ्यावे. लॉकडाऊनमुळे रोजंदारी मजूर आणि श्रमिकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे आम्ही सर्व लॉकडाऊनच्या विरोधात आहोत. यापुढे आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आम्हाला जेथे, ज्या क्षेत्रात कार्य करायचे तेथे करु. फक्त कोव्हिड-१९ चा हा काळ सर्वांसाठी वाईट आहे. अशा काळात तरी पालकमंत्र्यांनी घाणेरडे राजकारण करु नये, असेही सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी म्हटले आहे.








