Published On : Sat, Dec 2nd, 2017

जि.प.च्या डवलामेटी उच्च प्राथ. डिजिटल शाळेला पालकमंत्र्यांची भेट


नागपूर: जिल्हा परिषदेच्या डवलामेटी येथील उच्च प्राथमिक डिजिटल शाळेला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी जिल्ह्यातील शाळांचा हा खारीचा वाटा आहे.

याप्रसंगी पालकमंत्र्यांसोबत जि.प.च्या सीईओ कादंबरी बलकवडे, शिक्षण सभापती उकेश चव्हाण, प्रेम झाडे, शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे व अन्य उपस्थित होते.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या तीन शाळा डिजिटल झाल्या आहेत. बोरी पहिलेपार, बाजारगाव आणि डवलमेटी या तीन शाळांमध्ये विद्यार्थी डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकत आहेत. डवलामेटी येथे पहिल्या टप्पात 5 ते 7 या वर्गाच्या विद्यार्थ्यांना डिजिटलच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकवला जात आहे. सर्व विद्यार्थ्यांना संगणक हाताळण्याचे ज्ञान दिले जात आहे.

पालकमंत्री बावनकुळे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारची माहिती विचारली. प्रश्नोत्तरे झाली. वर्गातील विद्यार्थिनीने डिजिटल स्क्रीन कसा हाताळायचा हे पालकमंत्र्यांनी प्रात्याक्षिकातून दाखविले. पालकमंत्र्यांच्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी योग्य उत्तरेही दिली. या शाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थितीही डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून घेतली जाते. शिकविला जाणारा अभ्यासक्रम डिजिटल स्क्रीनवर उपलब्ध असतो. प्रत्येक विद्यार्थ्याला हा स्क्रीन कसा हाताळायचा या शिक्षण दिले गेले आहे. गेल्या वर्षभरापासून हे विद्यार्थी डिजिटल शिक्षण घेत आहे.

पालकमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक केले. जिल्ह्यातील सर्व शाळा सोलरवर आणून दिवसा 10 तास वीजपुरवठा या शाळांना करण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी याप्रसंगी सांगितले. सर्व शाळा सोलरवर आणण्यासाठी आवश्यक ती कारवाई जिल्हा परिषद आणि महाऊर्जाच्या अधिकार्‍यांनी लवकर करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.