Published On : Tue, Jun 28th, 2022

पालकमंत्र्यांनी दिली बाजीराव साखरे ई-वाचनालयाला भेट

Advertisement

विद्यार्थ्यांशी साधला संवाद, समस्या जाणून घेतल्या : आवश्यक सुविधांबाबत निर्देश

नागपूर : नागपूरचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सोमवारी (२७ जून) उत्तर नागपुरातील नागपूर महानगरपालिकेतर्फे संचालित बाजीराव साखरे ई-वाचनालयाला भेट दिली आणि येथे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनपातर्फे विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेसाठी पाच लक्ष रुपयांची खरेदी केलेल्या १२०० पुस्तकांचे लोकार्पण केले. याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी श्रीमती विमला आर., सहायक आयुक्त श्री. विजय हुमणे आणि शिक्षणाधिकारी श्रीमती प्रीति मिश्रीकोटकर उपस्थित होत्या.

नागपूर महानगरपालिकेतर्फे संचालित बाजीराव साखरे ई-वाचनालयामध्ये दररोज मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी येतात आणि दिवसभर येथे अभ्यास करतात. दररोज २०० पेक्षा जास्त विद्यार्थी येथे भेट देतात. त्यांच्यासाठी संगणक व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. वाचनालयात अभ्यासासाठी मुले आणि मुलींची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. येथील वाचनालयात अद्ययावत पुस्तके उपलब्ध करण्यात आलेली आहेत. वाचनालयात येणारे विद्यार्थी एमपीएससी, यूपीएससी, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि बँकिंगच्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करतात. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांना पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत.

यावेळी पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पालकमंत्र्यांनी वाचनालयात दिल्या जाणाऱ्या सोई सुविधांचे निरीक्षण केले आणि विद्यार्थ्यांसाठी त्यांना हवी असणारी पुस्तके उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. तसेच पालकमंत्र्यांनी इमारतीची देखरेख उत्तम रित्या ठेवण्याचे सुद्धा सूचना दिली आणि अभ्यागतांसाठी उत्तम वातावरण निर्मिती करण्याचे निर्देश दिले. पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

वाचनालयामध्ये आज विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी भविष्यात राज्य आणि केंद्राच्या विविध विभागांमध्ये सेवा देणार आहेत. देशात नागपूर शहराचे नाव लौकीक करण्यासाठी पात्र असलेल्या या विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शनाची व्यवस्था करण्याचेही निर्देश यावेळी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. वाचनालयात थंड पाण्याची व्यवस्था करणे, प्रत्येक टेबलवर लॅपटॉप चार्जिंगची सोय करणे आणि जंबो प्रिंटरची व्यवस्था करण्याची सूचना देखील त्यांनी केली. विद्यार्थ्यांना जगातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून इंटरनेटद्वारे माहिती प्राप्त करून घेता यावी यासाठी वायफाय ची सुविधा देण्याचेही निर्देश त्यांनी दिले. यावेळी संजय दुबे, सामाजिक कार्यकर्ता, वाचनालय अधीक्षक अलका गावंडे, वाचनालयचे सहायक ग्रंथपाल विशाल शेवारे उपस्थित होते.