पालकमंत्री बावनकुळेंचा सावनेर मतदारसंघात प्रचाराचा धडाका

Advertisement

तीन जाहीरसभा, तेरा गावांमध्ये मतदारांशी थेट संपर्क जनतेला हवे आता परिवर्तन

नागपूर: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज संपूर्ण दिवसभर सावनेर या प्रतिष्ठेच्या लढत असलेल्या मतदारसंघात तीन गावांमध्ये जंगी जाहीरसभा घेतल्या तर सुमारे 11 गावांमध्ये मतदारांशी थेट संपर्क करून हा मतदारसंघ प्रचाराने पिंजून काढला. या प्रचारात जनतेने आता परिवर्तन संकल्प केला असल्याचे चित्र या मतदारसंघात पाहायला मिळाले.

यावेळी त्यांच्यासोबत अशोक धोटे, संजय टेकाडे, अरविंद गजभिये, अशोक तांदुळकर, सोनबा मुसळे, प्रकाश टेकाडे, किशोर मुसळे, मधुकर इंगोले, विजय देशमुख, आदी उपस्थित होते. खापरखेडा येथे भाजपा कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पालकमंत्र्यांनी सांगितले शेवटचे तीन दिवस आहेत. घरोघरी संपर्क करा, कोणत्याही दबावाला बळी पडू नका. भाजपाच्या उमेदवाराचा धडाक्याने प्रचार करा. चुकीची बटन दाबू नका असे मतदारांना आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

वलनी या भागात हिंदी भाषी मतदार आहेत. येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली असता अनेक मतदारांनी या भागात दहशत पसरवली जात असल्याची तक्रार केली. पण कार्यकर्त्यांनी प्रचारात मागे पडू नका. आपल्याला जिल्ह्यातील सहाही जागा निवडून आणणायच्या आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्याकडे अधिक लक्ष देण्याची सूचनाही करण्यात आली.

पाटणसावंगी येथे शंभरावर भाजपा कार्यकर्ते व बुथप्रमुखांची बैठक पालकमंत्री बावनकुळे यांनी घेतली. या बैठकीत अशोक धोटे यांनी 15 वर्षाची दादागिरी संपुष्टात आणायची आहे. परिवर्तनाचा संकल्प आता जनतेने केला आहे. मीच विकास करीत आहे, असे चित्र निर्माण करण्यात येत असल्याचेही अशोक धोटे म्हणाले.

बडेगाव येथे एक छोटेखानी जाहीरसभा पालकमंत्र्यांनी घेतली. येथे भजनाच्या माध्यमातून भाजपा महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार सुरु होता. या सभेत पालकमंत्र्यांनी जातीपातीचे राजकारण करू नका. डॉ. राजीव पोतदार यांना मतांचे दान द्या. तुम्ही दिलेल्या कर्जाची परतफेड विकास कामे करून करू, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

सावनेर येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीला पालकमंत्र्यांनी संबोधित करून गाफिल राहू नका. बुथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख यांनी घरोघरी जावे. वेळेवर मतदारांकडे मतदानाचे कार्ड पोहोचवावे. मतदानाची टक्केवारी कशी जास्त होईल यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.

केळवद येथे जंगी जाहीरसभा झाली. केळवदसारख्या लहानशा गावात बाजार चौकात मोठ्या संख्येने महिला-पुरुष या सभेला उपस्थित होते. मोहपा येथेही कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांना कामाला लावले. धापेवाडा येथेही एका जाहीरसभेला संबोधित करून भाजपा उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन पालकमंत्री बावनकुळे यांनी केले.

यानंतर वाघोडा, वाकोडी, पिपळा, दहेगाव या चारही गावात रात्री पालकमंत्री बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून प्रचाराची माहिती घेतली. तसेच नागरिकांच्या मनात काय आहे, आपल्याला कुठेही अडचण येणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी या चारही गावात कार्यकर्त्यांना दिल्या.