Published On : Mon, Apr 30th, 2018

पोर्णिमा दिवसानिमित्त मनपा-ग्रीन व्हिजील तर्फे जनजागृती

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिका व ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने पौर्णिमा दिवसानिमित्त विधान भवन चौक येथे जनजागृती अभियान राबविण्यात आले. अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन स्वयंसेवकांनी परिसरातील व्यापाऱ्यांना केले.

या जनजागृती कार्यक्रमात आमदार प्रा. अनिल सोले सहभागी झाले. यावेळी त्यांनीही स्वयंसेवकांचा उत्साह वाढविला. स्वयंसेवकांसोबत त्यांनीही व्यापाऱ्यांना ऊर्जाबचतीचे महत्त्व समजावून सांगितले. ऊर्जाबचत ही काळाची गरज असून गेल्या काही वर्षांपासून नागपूर महानगरपालिका ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या सहकार्याने ऊर्जाबचतीचा हा उपक्रम राबवित आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये सुद्धा नागपुरातील या अभिनव उपक्रमाचा उल्लेख केला असल्याची माहिती आमदार अनिल सोले यांनी यावेळी दिली.


ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी याबाबत बोलताना म्हणाले, आमदार अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून अविरत राबविण्यात येत आहे. यामुळे आतापर्यंत व्यापारी आणि नागरिकांच्या सहकार्याने वीज बचत करण्यात आली आहे. दिवसेंदिवस या उपक्रमात नागरिकांचा सहभाग वाढत असून आता उत्स्फूर्तपणे अनावश्यक वीज दिवे पोर्णिमा दिवसाव्यतिरिक्त अन्य दिवशीही नागरिक बंद ठेवत असल्याचे ते म्हणाले.


यावेळी स्वयंसेवकांनी व्यापाऱ्यांसोबतच विधान भवन चौकातील सिग्नलवर थांबलेल्या वाहनचालकांना वीज बचतीचे महत्त्व सांगितले. या जनजागृती अभियानात नागपूर महानगरपालिकेचे सहायक अभियंता (विद्युत) अजय मानकर, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या टीम लीडर सुरभी जैस्वाल, कल्याणी वैद्य, विष्णूदेव यावद, दादाराव मोहोड, अभय पौनीकर, सारंग मोरे, सौरभ अंबाडे, अमित पालिया आदी सहभागी झाले होते.