Published On : Tue, Aug 29th, 2017

राज्य मंत्रिमंडळ विस्तारास केंद्रीय नेतृत्वाकडून हिरवा कंदील, सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांनाच

Advertisement

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या वावड्या उठत होत्या, मात्र आता या वावड्यांना मूर्त स्वरूप येत असल्याचे दिसून येत आहे. रविवारी रात्री भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळ विस्ताराला परवानगी दिली असून मंत्री निवडीचे पूर्ण अधिकारही मुख्यमंत्र्यांनाच दिल्याची माहिती भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर अमित शहा, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघटन मंत्री व्ही. सतीश यांच्यात अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. रात्री एक वाजेपर्यंत चाललेल्या या बैठकीत राज्यात पक्षवाढीसह, मंत्रिमंडळ विस्तार आणि शिवसेनेच्या भूमिकेबाबत चर्चा झाली. मीरा-भाईंदर महापालिकेत भाजपला मिळालेल्या यशामुळे अमित शहा आणि व्ही. सतीश यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. सूत्रांनी सांगितले की, राज्यात पक्षवाढीसाठी काय- काय प्रयत्न करणे आवश्यक आहे, केंद्रातील नेत्यांकडून कशा प्रकारची मदत हवी? आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी काय करावे लागेल, कोणत्या अडचणी आहेत यावर बैठकीत सखोल चर्चा झाली.

दिल्लीतून सर्व प्रकारची मदत केली जाईल, फक्त रिझल्ट चांगले हवेत, असे शहा यांनी सांगितल्याचे समजते. बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा झाल्याची माहिती देऊन सूत्रांनी सांगितले, अमित शहा यांनी मंत्रिमंडळ विस्तार करण्यास परवानगी दिली, मात्र खांदेपालट आणि नवीन मंत्र्यांच्या समावेशाबाबत अमित शहा काही बोलले नाहीत. याचे सर्व अधिकार त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले असून ते देतील ती यादी अंतिम असेल, असेही स्पष्ट केले.

नारायण राणेंचा विषय राहिला बाजूलाच
अमित शहांच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत काही चर्चा झाली नसल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. राणेंच्या भाजप प्रवेशापेक्षा पक्षाचे स्वतःचे महत्त्वाचे विषय बैठकीत होते. नारायण राणे भाजपमध्ये येण्यास उत्सुक असले तरी शहा यांनी राणेंबाबत चकार शब्दही बैठकीत काढला नाही, त्यामुळे भाजप राणेंना किती महत्त्व देत आहे ते दिसून येत आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतरच राणेंबाबत विचार केला जाईल, तोपर्यंत तरी त्यांना वाट पाहावी लागणार असल्याचे समजते.

शिवसेनेची काळजी करू नका : मुख्यमंत्री
शिवसेनेच्या विरोधाच्या भूमिकेबाबतही बैठकीत चर्चा झाली. पंतप्रधानांवर शिवसेनेतर्फे केल्या जात असलेल्या टीकेबाबत अमित शहा आणि रावसाहेब दानवे यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘शिवसेनेची चिंता करू नका, उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून मार्ग काढला जाईल,’ असे अमित शहा यांना सांगितले. दरम्यान, शहा यांनी प्रकाश मेहता आणि अन्य मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबतही बैठकीत चर्चा केली आणि सर्व प्रकरण समजून घेतले, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

दानवे राणेंकडे बाप्पाच्या दर्शनाला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री नारायण राणे यांच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले होते. नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा फोटो ट्विट करून चर्चेला तोंड फोडले होते. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही नारायण राणे यांच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले. त्यावर अमित शहा यांचा निरोप घेऊन ते नारायण राणे यांच्याकडे गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. दानवे कोणताही निरोप घेऊन राणेंकडे गेले नसून दर्शनाला गेल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.