Published On : Wed, Jun 28th, 2017

चालता-बोलता व्यायामासाठी खापरखेड्यात “ग्रीन जिम”

  • खापरखेडा वीज केंद्राचा अभिनव उपक्रम
  • युवा पिढीला नवी दिशा
  • आरोग्यासाठी थोडा वेळ देणे गरजेचे


खापरखेडा :
आरोग्यविषयक जाणीव निर्माण झाली तर आपण शरीरासाठी थोडा वेळ काढतो अन्यथा कुठलातरी मोठा आजार जडला की वैद्यकीय सल्ल्याने आपल्याला नाईलाजास्तव किंबहुना मृत्युच्या भयाने शरीराकडे गांभीर्याने बघावे लागते व व्यायाम करावा लागतो. निसर्गरम्य बागेतील मोकळ्या जागेत, घरातील टीव्ही पासून दूर आणि बालकांपासून आबालवृद्धांच्या सानिध्यात नवीन व्यायाम संस्कृती उदयास आली ती म्हणजे “ग्रीन जिम”.

खापरखेडा वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजकुमार तासकर हे उत्तम योग शिक्षक आहेत. त्यांच्या पुढाकारातून, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रकाशनगर वसाहतीतील ई टाईप बगीच्यात “ग्रीन जिम”चे लोकार्पण करण्यात आले. सध्यस्थितीत ग्रीन जिमची दोन उपकरणे लावण्यात आली असून लवकरच निरनिराळ्या प्रकारची दहा उपकरणे लावण्यात येणार असल्याने खुल्या वातावरणात एकाच वेळी दहा ते पंधरा व्यक्तींना याचा लाभ घेता येईल.

शरीरस्वास्थ्य सुदृढ ठेवायचे झाल्यास नियमित व्यायाम व शिस्त अंगीकारावी लागते. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले ठेवण्याचे अनेक मार्ग आहेत ज्यामध्ये, ध्यानसाधना, प्राणायाम, योगासने, व्यायाम, कसरत इत्यादी प्रकार समाविष्ठ आहेत. घरी व्यायाम होत नाही म्हणून व्यायामशाळा निर्माण झाल्या. त्याचे रुपांतर हल्ली वातानुकुलीत झाले व पर्यायाने जमीन व निसर्गाचा संबंधच तुटला. अशा वातावरणात “ग्रीन जिम” च्या माध्यमातून बगीचा, मोकळी जागा व नैसर्गिक वातावरणात अगदी सहजरीत्या गप्पा-गोष्टी करतांना पर्यावरणस्नेही व्यायामाची केवळ लोकप्रिय जागा झाली नसून तर रहिवाश्यांना व्यायामासाठी आकर्षित करीत आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष होत असलेल्या युवापिढीला ग्रीन जिमच्या माध्यमातून एक नवी दिशा मिळेल तर ज्येष्ठ नागरिकांना आपल्या नातवंडांना बगीच्याची सैर करताना ग्रीन जिमचा लाभ घेता येईल.

धकाधकीच्या जीवनात मानवाची मातीशी नाळ सैल झाल्याने विविध प्रकारचे ताणतणाव सातत्याने वाढतच आहे व पर्यायाने रोग प्रतिकारात्मक शक्तीचा ऱ्हास होताना दिसून येतो. अशा परिस्थितीत, प्रत्येकाने आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवणे हि काळाची गरज बनली आहे. आरोग्यविषयक जाणीवेतून प्रकाशनगर वसाहतीतील जास्तीत जास्त रहिवाश्यांनी ग्रीन जिम चा लाभ घ्यावा असे आवाहन राजकुमार तासकर, मुख्य अभियंता यांनी केले आहे.