महा मेट्रो : रिच-३ मध्ये सेगमेंट कास्टिंगचे कार्य पूर्ण

व्हायाडक्टचे ९० टक्के कार्य पूर्ण

नागपूर: महा मेट्रो नागपूर प्रकल्पाच्या रिच-३ मध्ये लागणाऱ्या सेगमेंट कास्टिंगचे कार्य पूर्ण झाले. महा मेट्रोच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेवटच्या सेगमेंटचे कास्टिंग करण्यात आले. २८ फेब्रुवारी २०१७ रोजी सेगमेंट कास्टिंगच्या कार्याला सुरवात करण्यात आले होते. सरासरी १ दिवसात ४ सेगमेंट तयार करून केवळ २ वर्षाच्या कालावधीत सुमारे ३५६४ सेगमेंट तयार करण्याचे कार्य महा मेट्रोने पूर्ण केले आहे. रिच-३ मध्ये उभारण्यात आलेल्या ३९३ पियर’वर या सेगमेंटच्या लॉन्चिंगचे कार्य होणार आहे.

हिंगणा येथील मेट्रोच्या कास्टिंग यार्ड मध्ये हे सर्व सेगमेंट तयार करण्यात आले असून या रिच मध्ये व्हायाडक्टचे ९० टक्के कार्य पूर्ण झाले आहे. सेगमेंट कास्टिंगसह ओपन फाऊंडेशन, पाईल, पाईल कॅप, व्हायाडक्ट पियर, स्टेशन पियर, आय गर्डर कास्टिंग, आय गर्डर लॉंचिंग, डेक स्लॅब कास्टिंगचे कार्य पूर्ण झाले आहे. तसेच स्टेशन पियर काँक्रिट, पियर कॅप+पोर्टल, स्टेशन पियर आर्म काँक्रिट, स्टेशन पियर कॅप, सेगमेंट लॉंचिंग, पियर आर्म ट्रॅक लेव्हलचे कार्य अंतिम टप्यात आहे.

लवकरच महा मेट्रो नागपूर प्रकल्पाच्या रिच-१ आणि रिच-३ मध्ये मेट्रोची प्रवासी सेवा नागरिकांसाठी सुरु करण्यात येणार आहे. यासाठी महा मेट्रोचे अधिकारी आणि कर्मचारी रात्र दिवस कार्य करत आहेत. निर्धारित वेळेत रिच-३ मध्ये लागणाऱ्या सेगमेंटचे कार्य पूर्ण करण्यासाठी १००० कर्मचारी हिंगणा कास्टिंग यार्ड येथे कार्यरत होते. सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करून मेट्रो अधिकाऱ्यांच्या देखरेखीत सदर कार्य पूर्ण करण्यात आले आहे.

रिच-३ अंतर्गत सीताबर्डी येथील मुंजे चौक मेट्रो स्टेशन ते लोकमान्य नगर पर्यंत अश्या १०.३ किमीच्या या मार्गावर एकूण १० स्टेशन प्रस्तावित आहे. हिंगणा येथे मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या आणि महाविद्यालये आहेत, त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या सर्व प्रवाश्यांना लवकरात लवकर मेट्रोची सेवा उपलब्ध व्हावी यासाठी महा मेट्रोचे अधिकारी प्रयत्नशील आहेत.