Published On : Thu, Dec 13th, 2018

नाग नदी दर्शनी भाग सौंदर्यीकरण प्रकल्पाचा बृहत्‌ आराखडा मनपा आयुक्तांकडे सुपूर्द

फ्रान्स डेव्हलपमेंट एजन्सीच्या सहकार्याने खुलणार नाग नदीचे सौंदर्य

नागपूर: नागपूर शहराचे एकेकाळचे वैभव असलेल्या नाग नदीच्या पुनरूज्जीवनासाठी फ्रान्स डेव्हलपमेंट एजन्सी (एएफडी)ने पुढाकार घेतला आहे. एएफडीने नाग नदीच्या दर्शनी भागाच्या सौंदर्यीकरण प्रकल्पाचा बृहत्‌ आराखडा नुकताच नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे सुपूर्द केला.

नागपूर महानगरपालिकेने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनातून नद्यांच्या संबंधात दोन प्रकल्प हाती घेतलेले आहे. पहिला प्रकल्प नाग नदी प्रदूषण निर्मूलन तर दुसरा प्रकल्प नाग नदीच्या दर्शनी भागाचे सौंदर्यीकरण या संबंधी आहे. नाग नदीमध्ये वाहणारे सांडपाणी थांबवून त्यावर प्रक्रिया करून नदीमध्ये पुन्हा सोडणे तसेच उत्तर सिवरेज झोन व मध्य सिवरेज झोन अंतर्गत सांडपाण्याची निर्मिती व निस्सारण संबंधित पहिला प्रकल्प असून यासाठी केंद्र शासनाद्वारे मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. याशिवाय वित्तीय व्यवस्थापनाकरिता जिका (जापान) संस्थेद्वारे राज्य व केंद्र शासनाला वित्तीय मदत मंजुरी प्राप्त आहे. या प्रकल्पाची मंजूर किंमत १२५२.३३ मृदू कर्ज स्वरूपात आहे.

दुसरा प्रकल्प ‘नाग नदी दर्शनी भागाचे सौंदर्यीकरणा’चा आहे. फ्रान्स डेव्हलपमेंट एजन्सी (एएफडी) यांनी देशातील तीन शहरांची निवड केलेली आहे. यामध्ये चंदीगड, पॉण्डीचेरी व नागपूरचा समावेश आहे. नागपूर करीता ‘नाग नदी दर्शनी भागाचे सौंदर्यीकरण’ प्रकल्पाकरीता बृहत्‌ आराखडा प्रकल्प अहवाल व तांत्रिक मदत मोफत देण्याकरीता निवड केलेली आहे. प्रकल्प राबविण्यासाठी वित्तीय मदत फ्रान्सकडून मिळविण्यास संमती देण्यात आली आहे.

या संदर्भात १० ते १३ डिसेंबर दरम्यान एएफडी चमूने नागपूर महानगरपालिकेला भेट दिली. शहरातील वनामती येथे प्रकल्पासंबंधी तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेमध्ये नागपूर महानगरपालिका, महामेट्रो, व्ही.एन.आय.टी., नीरी, सामाजिक संस्था, नागपूर सुधार प्रन्यास, वन विभाग, कृषी विद्यापीठ, स्मार्ट सिटी, एन.ई.एस.एल. व इतर भागधारक यांना आमंत्रित करण्यात आले. प्रकल्पाची वेगवेगळ्या स्तरावर गट तयार करून चर्चा करण्यात आली. पूर व्यवस्थापन, गतीशिलता, पुनर्वसन, जैव विविधता, पर्यावरण व वेगवेगळ्या विभागाचे समन्वयन याबाबत चर्चा करून प्रकल्पांतर्गत करण्यात आलेल्या कामाचे प्राधान्य ठरविण्यात आले.

यावेळी बृहत्‌ आराखडा (मास्टर प्लान) मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांना सादर करण्यात आला. मनपा नदी चमू प्रमुख व मनपा तांत्रिक सल्लागार मो. इसराईल यांनी कार्यशाळेचे समन्वयन केले. चमूचे अधिकारी नदी व सरोवरे प्रकल्प अधिकारी मो. शफीक, संदीप लोखंडे, श्री. जीवतोडे, डॉ. प्रणिता उमरेडकर यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेकरीता सहकार्य केले. मनपा आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, राम जोशी, अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते यांनी प्रामुख्याने कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला.

एएफडी फ्रान्सचे गॉटीएर कोहलेर (Mr. Gautier Kohler), एएफडी दिल्लीच्या व्‍हॅलेन्टाइन लेनफन्ट (Ms. Valentine Lenfant), सिबीला जान्सिक (Ms. Sibila Janksic), पी.के. दास असोसिएशनचे समर्थ दास (Mr. Samarth Das), मिसाका हेत्तीयारच्ची (Mr. Missaka Hettiarchchi), प्रियंका जैन (Ms. Priyanka Jain), ब्लेंझ वारलेट (Blanche Varlet) यांनी कार्यशाळेचे संचालन करून पुढील काळातील नियोजनाबाबत मनपा अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रकल्पाची राशी अंदाजे १६०० कोटी एवढी आहे.