नागपूर : मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देऊ नये. तसेच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या मागणीसह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ओबीसी समाजबांधवांनी नागपुरात महामोर्चा काढला.
ओबीसी समाजाचा मोर्चा आज सोमवारी दुपारी १२ वाजता, संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला. मोर्च्यात ओबीसी समाज मोठया संख्येने सहभागी होत आहे, असे सांगण्यात आले.भाजप,काँग्रेस,राष्ट्रवादीचे ओबीसी नेतेही या महामोर्चात सहभागी झाले आहेत. ओबीसींच्या प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी समाजबांधव सकाळपासूनच नागपुरात दाखल झाले. दुपारी १ वाजतापर्यंत संविधान चौकात बहुसंख्येने समाजबांधव एकत्र आल्यानंतर महामोर्चाला सुरुवात झाली.
मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये, बिहारच्या धर्तीवर राज्यात ओबीसींचा जातनिहाय सर्व्हे करावा, संपूर्ण देशात ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे करावी, कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देऊ नये, ५२ टक्के ओबीसी समाजाला तितकेच आरक्षण देण्यात यावे, सर्वोच्च न्यायालयाने लादलेली ५० टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करावी, ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यासाठी मंजूर ७२ वसतिगृहे त्वरित भाड्याच्या इमारतीत सुरू करावी, वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना लागू करावी, शिष्यवृत्ती आणि फ्रीशिप योजना त्वरित लागू करावी, नॉन क्रिमिलेअरची आठ लाखांची मर्यादा रद्द करावी, म्हाडा आणि सिडको योजनेत ओबीसींना आरक्षण लागू करावे आदी मागण्यांसाठी ओबीसी समाजाच्या वतीने हा महामोर्चा काढण्यात आला.