Published On : Mon, Jul 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर गुन्हे शाखेची कामगिरी;स्वस्त ग्रॅनाईटच्या आमिषाने फसवणूक; राजस्थानातून आरोपीला अटक

Advertisement

नागपूर : स्वस्त दरात ग्रॅनाईट देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची 3.35 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आरोपीला नागपूर गुन्हेशाखा युनिट क्रमांक 4 ने राजस्थानमधून अटक केली आहे. आरोपी इतर चार गुन्ह्यांमध्येही वाँटेड असल्याचे तपासात उघड झाले आहे.

बेलतरोडी परिसरातील शुभांगी नगर-2 येथे राहणारे रघुनाथप्रसाद कुमार गुजर हे ग्रॅनाईट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. जानेवारी-फेब्रुवारी 2026 दरम्यान आरोपी संदीप महेंद्रदान चारण याने इन्स्टाग्रामवर संपर्क साधत व्हिडिओ कॉलद्वारे स्वस्त दरात ग्रॅनाईट उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. ग्रॅनाईटचे फोटो आणि व्हिडिओ दाखवून विश्वास संपादन केल्यानंतर फिर्यादींकडून ऑनलाइन 3 लाख 35 हजार रुपये घेतले. मात्र, पैसे मिळाल्यानंतर आरोपीने फोन बंद करून कोणताही माल न पाठवता फसवणूक केली.

या प्रकरणी बेलतरोडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 316(2), 318(4) तसेच आयटी अॅक्टच्या कलम 66(C) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान गुन्हेशाखा युनिट क्रमांक 4 ने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढला. राजस्थानातील चूरू जिल्ह्यातील सरदारशहर तालुक्यातील खंडिया गावात सापळा रचून आरोपी संदीप महेंद्रदान चारण (वय 29) याला त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली.

Advertisement

चौकशीत आरोपी इतर चार फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्येही वाँटेड असल्याचे समोर आले. पुढील कारवाईसाठी आरोपीला बेलतरोडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्रमांक 4 चे पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत, उपनिरीक्षक जितेश आरवेल्ली तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.