नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मनपाच्या वतीने ‘रंग दे नागपूर’ या भित्तीचित्र रेखाटन स्पर्धेचे (wall painting competition) आयोजन येत्या ११ व १२ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. चार संकल्पनेवर आधारित असणाऱ्या या स्पर्धेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, २ ऑक्टोबर पर्यंत ही नोंदणी करता येणार आहे. शहर सौंदर्यीकरणासाठी कलावंतानी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येत स्पर्धेत सहभागी घ्यावा असे आवाहन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी केले आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या देखरेखीत ‘रंग दे नागपूर’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या माध्यमातून मनपाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचे आणि भविष्याचे दर्शन घडविणे हा उद्देश आहे. विद्यार्थी (१८ वर्षांवरील) आणि व्यावसायिक अशा दोन गटात ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. यात विद्यार्थी गटामध्ये बीएफए, एम एफ ए. एटीडी, गीडी फाईन आर्ट विद्यार्थी यांचा समावेश असू शकतो, तर व्यावसायिक गटात हौशी चित्रकार आणि फाईन आर्टचे पदवीधर (उत्तीर्ण विद्यार्थी) यांचा समावेश असू शकतो, प्रत्येक गटात ५ सदस्य असणार आहेत.
अशा आहेत संकल्पना
रंग दे नागपूर स्पर्धेसाठी १) ‘नागपूर ॲट ७५’: अनेक दशकांतील वाढीचा आणि परिवर्तनाचा प्रवास, २) ‘स्वच्छ, हरित आणि स्मार्ट नागपूर’: स्वच्छता, हिरवळ आणि स्मार्ट सिटी विकास, ३) नागपूरची संस्कृती, इतिहास आणि वारसा आणि ४) ‘नागपूर- द टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ या चार संकल्पना निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार चित्रकाराला आपल्या कल्पकतेने चित्र साकारायचे आहे.
विशेष बक्षिसे..
स्पर्धेतील विद्यार्थी गटातील विजेत्यांना १ लाख रुपयांचे पहिले बक्षीस, ७५ हजार रुपयांचे दुसरे बक्षीस आणि ५० हजार रुपयांचे तिसरे बक्षीस दिले जाणार आहे. तर व्यावसायिक गटातील विजेत्यांना १ लाख २५ हजारांचे पहिले बक्षीस १ लाख रुपयांचे दुसरे बक्षीस आणि ७५ हजार रुपयांचे तिसरे बक्षीस दिले जाणार आहे.
असे सहभागी व्हा..
स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी इच्छुकांनी येत्या २ ऑक्टोबर पर्यंत आपले स्केच abhijaatsankalpana08@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावे. असे आवाहनही मनपाद्वारे करण्यात आले आहे. समितीद्वारे निवडण्यात आलेल्या पात्र चित्रांना ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी स्पर्धेसाठी स्थान दिले जाणार आहे. स्पर्धकांना ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.०० वाजता शासकीय कला आणि डिझाइन महाविद्यालय येथे स्पर्धेचे साहित्य जसे रंग, ब्रश आणि भिंतीचे क्रमांक दिले जातील. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, स्पर्धकांनी https://forms.gle/hScXdEJdE8vqj8NGA या गुगल फॉर्मवर नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच अधिक माहितीसाठी 7020664762 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहनही मनपाद्वारे करण्यात आले आहे.












