नागपूर : “विश्वाचे मूळ तत्त्व आनंद आहे. अध्यात्मिकता आणि संस्कृती या माध्यमातूनच तो आनंद व्यक्त होतो. आजच्या तणावग्रस्त जीवनात आनंदाच्या प्रकटीकरणासाठी उत्सव अपरिहार्य आहेत,” असा मनोवेधक संदेश श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष आणि आध्यात्मिक गुरु प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी दिला.शुक्रवारी सायंकाळी हनुमाननगर येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर बहुप्रतिक्षित ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव – 2025’ चे त्यांच्या शुभहस्ते भव्य उद्घाटन झाले. या वेळी प्रेक्षकांमध्ये अपार उत्साह आणि संस्कृतीचा जिवंत अनुभव जाणवत होता.
स्वामी महाराज म्हणाले, “नितीन गडकरी यांच्या प्रेरणेने प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघात अशा महोत्सवांचे आयोजन करावे. हे आयोजन भारतीय संस्कृती, एकता आणि अध्यात्म यांचे प्रतिक आहे. लोकांनी आधुनिकतेच्या नादात पाश्चिमात्य अंधानुकरण टाळून आपल्या सांस्कृतिक मुळांचा सन्मान करावा.”
कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक पद्मश्री डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच राज्यमंत्री आशीष जैसवाल, माजी खासदार दत्ता मेघे, दयाशंकर तिवारी, अजय संचेती, राजेश लोया यांच्यासह महोत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते.
अनिल सोले यांनी प्रास्ताविक सादर करताना महोत्सवाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली, तर बाळ कुलकर्णी यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. उद्घाटनानंतर अभिनेते आशुतोष राणा यांच्या प्रमुख भूमिकेत रंगलेल्या ‘हमारे राम’ या नाट्यप्रयोगाने प्रेक्षकांच्या डोळ्यांत संस्कृतीचा तेजस्वी झोत निर्माण केला. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम्च्या सामूहिक गायनाने झाली.
प्रबोधन, प्रशिक्षण आणि संस्कार, हीच महोत्सवाची त्रिसूत्री: नितीन गडकरी
“हा महोत्सव केवळ सांस्कृतिक सोहळा नाही, तर एक ‘संस्कार यज्ञ’ आहे. प्रबोधन, प्रशिक्षण आणि संस्कार या त्रिसूत्रीच्या आधारे चांगल्या समाजाची निर्मिती होत आहे,” असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
“21 वे शतक भारताचे आहे. शिक्षण आणि संस्कार या दोन्हीत भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल,” असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
संस्कृती म्हणजे अध्यात्माची अभिव्यक्ती: डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी
“भारताची सकाळ अध्यात्माने आणि संध्याकाळ संस्कृतीने उजळते. नागपुरात हे दोन्ही एका ठिकाणी अनुभवायला मिळते, हे दुर्मिळ दृश्य आहे,” असे पद्मश्री डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी सांगितले.
“भगवान श्रीराम हे केवळ धर्माचे प्रतीक नव्हते, तर कला आणि नाट्यविद्येतही पारंगत होते. त्यामुळे ‘हमारे राम’ ही प्रस्तुती संस्कृतीचा गाभा अधोरेखित करते,” असे ते म्हणाले.
महोत्सवाच्या यशामागे सजग आयोजन समिती-
महोत्सवाच्या यशस्वितेसाठी प्रा. अनिल सोले (अध्यक्ष), डॉ. गौरीशंकर पाराशर (उपाध्यक्ष), प्रा. राजेश बागडी (कोषाध्यक्ष), जयप्रकाश गुप्ता (सचिव), तसेच बाळासाहेब कुलकर्णी, सारंग गडकरी, रेणुका देशकर, संदीप गवई, मनिषा काशीकर, संजय गुळकरी आदींनी विशेष परिश्रम घेतले.


















