Published On : Mon, Aug 21st, 2017

रेती व गौण खनिज वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांवर जीपीएस प्रणाली – सचिन कुर्वे

Advertisement
 

· 15 वाहनांवर जीपीएस प्रणाली बसविली
· दुसऱ्या टप्पात सर्व वाहने ट्रकींग प्रणालीमध्ये
· अवैध उत्त्खन्नाविरुध्द ड्रोनचा प्रभावी वापर


नागपूर:
रेती व गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस ट्रकींग प्रणाली बसविण्यात येत असून या प्रणालीमुळे अवैध रित्या वाहतूक करणाऱ्या वाहनांचा शोध घेणे सूलभ होणार आहे. जिल्हयात सर्वप्रथम 15 वाहनांवर जीपीएस प्रणाली बसविण्यात आले असून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आज दिली.

अवैध रित्या रेती तसेच गौण खनिज वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे जीपीएस ट्रकींग प्रणालीमुळे शक्य होणार आहे. या प्रणालीमुळे अवैध रेती वाहतुकीची माहिती तात्काळ उपलब्ध होईल. त्यादृष्टीने सर्वप्रथम 15 वाहनांवर जीपीएस प्रणाली बसविण्यात आली आहे. त्यानंतर सर्वच रेती व गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांवर जीपीएस प्रणाली बसविण्यात येणार आहे. खान पट्टेधारक, तसेच रेतीचा अधिकृत परवाना असलेल्या धारकांनी वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेल्या सर्व वाहनांवर जीपीएस ट्रकींग प्रणाली बसविण्याच्या सूचना देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.

जिल्हयात अधिकृत खान पट्टेधारकांची संख्या 116 तर रेती पट्टेधारकांची एकूण 36 संख्या असून सर्वांना जीपीएस प्रणाली असलेल्या वाहनातूनच वाहतूक करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने रेतीच्या अवैध वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी तीन महिन्यात धोरण ठरविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हयात सर्वात प्रथम जीपीएस प्रणाली बसविण्यात आली आहे.

रेतीची अवैधपणे उत्त्खन्न करणाऱ्या विरुध्द आळा बसावा यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे ड्रोन कॅमेराद्वारे रेतीघाटांवर नियंत्रण ठेवण्यात येत असून मागील वर्षी या प्रणालीमुळे चार रेतीघाट रद्द करण्यात आले आहे.