Published On : Mon, Aug 21st, 2017

शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद

 

·13 हजार 062 शेतकऱ्यांनी भरले ऑनलाईन अर्ज
·764 बॉयोमेट्रीक मशीनद्वारे ऑनलाईन सुविधा
·248 महा ई-सेवाकेंद्रावर सुविधा उपलब्ध

नागपूर: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजनेअंतर्गत शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत ऑनलाईन भरावयाच्या अर्जासाठी जिल्हयातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून 13 हजार 062 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत.
शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज भरता यावे यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तालुका, आपले सरकार सेवा केंद्र, सिटीजन सर्व्हिस सेंटर तसेच नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 72 शाखांमध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जिल्हयात 764 बॉयोमेट्रीक मशीन उपलब्ध झाल्या असून याद्वारे तालुकास्तरावर शेतकऱ्यांकडून कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरुन घेण्यात येत आहेत. ही सुविधा आपले सरकार 530 सेवाकेंद्र, सिटीजन सर्व्हिस सेंटर (सीएससी) 162, तसेच नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 72 शाखांमधून कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक मदत उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

जिल्हयातील 248 महा ई-सेवाकेंद्रावर ऑनलाईन कर्जमाफीचे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. शेतकरी बांधवांनी शासनाच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या केंद्रावर आपले ऑनलाईन अर्ज भरावे व या महत्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.