Published On : Sat, May 1st, 2021

महाराष्ट्र राज्य वर्धापन दिन: राज्यपालांचे राजभवन येथे ध्वजवंदन

Advertisement

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या एकसष्टाव्या वर्धापनदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (शनि. दि. १) राजभवन मुंबई येथे राष्ट्रध्वज फडकवला तसेच राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी सामूहिक राष्ट्रगीतगान झाले. राज्यपालांनी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी व पोलिसांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांनी राज्यातील जनतेला उद्देशून केलेले भाषण या सोबत देत आहे. हे भाषण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून तसेच आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनी व राज्यातील इतर प्रादेशिक केंद्रांवरून प्रक्षेपित करण्यात आले.

१.महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला माझ्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.

२.आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त देखील मी सर्व श्रमिक बंधू भगिनींना शुभेच्छा देतो.

३.राज्यनिर्मितीच्या आजच्या दिवशी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर विभूतींचे आणि समाजसुधारक नेत्यांचे स्मरण करणे औचित्यपूर्ण ठरेल.

४. कोविड – १९ च्या संकटावर मात करीत असताना, राज्याची अर्थव्यवस्था सांभाळत, वंचित-उपेक्षित, शेतकरी, महिलांना न्याय देतानाच राज्याच्या प्रगतीचा आलेख उंचावला जाईल यासाठी माझे शासन कार्य करीत आहे.

५. गेल्या सुमारे सव्वा वर्षाहून अधिक काळ आपण कोविड संसर्गाविरोधात एकजूटीने लढत आहोत. मात्र गेल्या काही दिवसांपासून करोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. माझ्या शासनाने या साथीला आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाय योजले आहेत. याबरोबरच लसीकरणाचा वेगही वाढवला आहे. २२ एप्रिलपर्यंत सुमारे १ कोटी ३७ लाख लोकांचे लसीकरण करुन महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. राज्याच्या विनंतीवरुन केंद्र शासनामार्फत हाफकिन संस्थेस नुकतीच लस उत्पादनासाठी परवानगी देण्यात आली आहे. राज्यात उत्पादीत होणारा ऑक्सिजन हा वैद्यकीय वापरासाठी १०० टक्के राखीव ठेवण्याचा निर्णय माझ्या शासनाने घेतला आहे. अतिरिक्त प्राणवायुची उपलब्धता करण्यासाठी राज्य शासनाच्या पुढाकाराने रेल्वेची विशेष ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ रवाना करण्यात आली. देशातील हा पहिलाच प्रयोग ठरला आहे.

६. माझ्या शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत प्रतिबंधाच्या काळात आर्थिक दुर्बल घटकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देण्यासाठी ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे.

७.प्रतिबंधाच्या कालावधीत गोरगरिबांना शिवभोजन थाळी मोफत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय माझ्या शासनाने घेतला आहे. राज्यातील सुमारे ७ कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

८.महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी माझ्या शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यामध्ये राज्याची बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.

९.शेतकरी थकबाकीदार होऊ नये यासाठी ३ लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२१ पासून शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय माझ्या शासनाने घेतला आहे.

१०. शेतकऱ्यांना थकीत वीजबिलात सवलत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

११.‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेंतर्गत राज्यातील पशुपालकांच्या दारी पशुवैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी माझ्या शासनाने प्रथम टप्प्यात ७१ तालुक्यांमध्ये ७१ फिरत्या पशुचिकित्सा पथकांची स्थापना करुन त्याचे लोकार्पण केले आहे.

१२. मराठी भाषा भवनचे उपकेंद्र ऐरोली, नवी मुंबई येथे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१३.विश्वविख्यात पार्श्वगायिका श्रीमती आशाताई भोसले यांना माझ्या शासनाने नुकताच ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर केला आहे.

१४.महाराष्ट्राच्या समृद्ध अशा मराठी रंगभूमीचा वारसा जपण्याच्या दृष्टीने गिरगाव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या पुनर्रचना प्रकल्पांतर्गत मराठी रंगमंच कलादालन उभारणीचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे.

१५.राज्य शासनाव्दारे प्रदान करण्यात येत असलेल्या विविध सुविधा नागरिकांना त्यांच्या घरानजीक प्राप्त व्हाव्या या हेतूने माझ्या शासनाने सुमारे ३२ हजार ०७५ ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ स्थापन केली आहेत. सेवा हमी अधिनियमांतर्गत आजपर्यंत ३७ विभागांशी संबंधित ४०३ सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

१६.महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देणारी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना, असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजना, राज्य राखीव महिला पोलिसांची स्वतंत्र तुकडी यांसारख्या महत्वपूर्ण निर्णयांमधून महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया गतिमान पद्धतीने पुढे जाईल, असा मला विश्वास आहे.

१७.शुन्य ते सहा वर्षे वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता या घटकांतील एकुण सुमारे ७५ लाख लाभार्थ्यांना अंगणवाड्यांमार्फत पोषण आहाराचा लाभ देण्यात आला आहे.

१८.दिव्यांग, अशासकीय संघटना, समाजसेवक आणि देणगीदार या सर्वांना एकाच छताखाली आणणे, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या योजनांची माहिती देणे यासाठी महा शरद डॉट इन (mahasharad.in) हे वेबपोर्टल सुरु करण्यात आले आहे.

१९.कोविड साथीच्या कालावधीत अनुसूचित जमातीच्या कुटूंबांची रोजगाराअभावी उपासमार होऊ नये म्हणून शासनाने खावटी अनुदान स्वरुपात सुमारे ११ लाख ५५ हजार कुटूंबियांना लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या कुटूंबियांना प्रति कुटूंब ४ हजार रुपये आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

२०. नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे नामकरण व लोकार्पण करण्यात आले आहे.

२१.मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील ८ महानगरपालिका आणि ७ नगरपालिका, नगरपरिषद यांचा समावेश करुन मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राकरिता ठाणे मुख्यालय असलेले एकच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र वगळता) लागू करण्याबाबतची अभ्यासगटाची शिफारस मान्य करण्यात आली आहे. याबाबत अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.

२२.मुंबई किनारा मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पाचे काम जलदगतीने सुरु असून वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूचे काम सुरु झाले आहे. मुंबईतील १४ मेट्रो लाइन्सचे ३३७ किलोमीटर लांबीचे काम प्रगतिपथावर आहे. सर्व १४ मेट्रो लाइन्सची कामे पूर्णत्वाच्या विविध टप्प्यावर आहेत.

२३.नागरी स्वच्छता अभियानातील कामगिरीत महाराष्ट्राने सातत्य राखले आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या १२ राष्ट्रीय पुरस्कारांपैकी सर्वाधिक ४ पुरस्कार राज्याने पटकावले आहेत, ही भूषणावह बाब आहे.

२४. प्रधानमंत्री आवास योजना व राज्यपुरस्कृत घरकुल योजनांमधून मार्च २०२१ अखेर ३ लाख ६२१ घरकुले बांधून पूर्ण करण्यात आली असून ४ लाख ४० हजार ९२४ घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

२५.जल जीवन मिशनअंतर्गत आतापर्यंत ९१ लाख ०५ हजार ग्रामीण कुटुंबांना वैयक्तिक नळजोडणी देण्यात आल्या आहेत. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा – २ अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी ६ हजार २१८ गावांमध्ये नियोजन करण्यात आले आहे तर ६ हजार २७५ गावात सांडपाणी व्यवस्थापनाची कामे करण्याचे नियोजन आहे.

२६.महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांचे जतन व संवर्धन करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे राज्याच्या प्राचीन वारशाचे जतन आणि संवर्धन होण्यास मदत होणार आहे.

२७.माझ्या शासनाने ‘पुणे – नाशिक मध्यम अतिजलद रेल्वे मार्ग’ या नवीन प्रकल्पाच्या निर्मितीसाठी राज्य शासनाचा हिस्सा देण्याचा निर्णय घेतला आहे.

२८. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे उद्दिष्ट वाढवून यावर्षी २५ हजार उद्योग घटकांना मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

२९.कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे चालू वर्षात जानेवारी ते मार्च अखेर ४३ हजार ९१० बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे.

३०.राज्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी माझ्या शासनाने कृषी पर्यटन धोरण, कॅराव्हॅन पर्यटन धोरण, बीच शॅक धोरण जाहीर केले आहे. यामुळे राज्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा मला विश्वास आहे.

३१. राज्य शासनाने जाहिर केलेल्या कोविड प्रतिंबधात्मक उपाययोजनांचे सर्वांनी पालन करावे, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन आदींची कटाक्षाने अंमलबजावणी करुन सुरक्षीत व्हावे. कोविडच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन मी करतो.

३२.एक नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी एकत्र येण्याचे मी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे. पुन्हा एकदा, महाराष्ट्र दिनाच्या या मंगल प्रसंगी राज्यातील जनतेला मी मन :पूर्वक शुभेच्छा देतो.