Published On : Thu, Apr 26th, 2018

महिला संघटित झाल्या तर सरकारला झुकावेच लागेल – पौर्णिमा वर्मा


नागपूर: महिला संघटित झाल्यास सरकारला झुकावेच लागेल असा दृढविश्वास गुलाबी गँग चा प्रदेश कमांडर पौर्णिमा वर्मा यांनी व्यक्त केला. त्या गुरुवारी रविभवन येथे पत्रकार आणि महिलांची संवाद साधत होत्या. कथुआ आणि उन्नाव येथे झालेल्याा गँगरेपच्याा घटनांवर त्यांनी संताप व्यक्त केला. सरकार आणि विरोधी पक्षातील नेते स्वार्थासाठी विकले गेलेे असल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी असलेल्या काही महिलांनी त्यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, तब्बल दोन वर्षांपासून सदर योजनेअंतर्गत त्यांना घरे मिळालेली नाहीत. याविषयी जिल्हाधिकारी आणि मनपायुक्त यांची भेट घेतल्यानंतरही आम्हाला दिलेले आश्वासन अजून पूर्ण झाले नसल्याची खंत महिलांनी व्यक्त केली. आपल्यासोबत १९ महिला लाभार्थी असून कोणालाही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अद्याप घर मिळाले नसल्याची तक्रार त्यांनी केली.

या योजनेअंतर्गत नागपूर क्षेत्रात उपलब्ध झालेल्या २१९ घरांपैकी आता केवळ २६ घरे शिल्लक असल्याची माहिती महिलांनी दिली. आपल्या हक्काची घरे मिळवण्यासाठी सदर महिलांनी काही स्वयंसेवी संस्थांना देखील संपर्क साधला. परंतु या संस्थांनी केवळ आश्वासन देऊन या योजनेतील घरे लाच स्वीकारून इतरांना किरायाने दिल्याचा धक्कादायक खुलासा याप्रसंगी महिलांनी केला.

यावर पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन घरांचा ताबा मिळण्याचा निश्चित कालावधी मागून घेण्यास पौर्णिमा वर्मा यांनी महिलांना सांगितले. यानंतरही प्रश्‍न मार्गी न लागल्यास आम्ही आपल्या पद्धतीने आंदोलन करून प्रशासनाला वठणीवर आणू असा इशारा त्यांनी दिला.


गुलाबी गँगच्या राष्ट्रीय कमांडर संपत पाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नागपूर येथे लवकरच एक विराट सभा घेण्याचा मानस वर्मा यांनी बोलून दाखवला. याप्रसंगी नागपूर क्षेत्रातील महिला शक्ती व इतर सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने एकत्रित व्हावे असे आवाहन पौर्णिमा वर्मा यांनी केले.