Published On : Tue, Apr 13th, 2021

शासनाने प्रत्येकी 10 हजार रुपयाची मदत करावी : बसपाची मागणी

नागपुर – दिवसेंदिवस कोरोनाचे भूत सर्वसामान्यांच्या मानगुटीवर बसत असून शासकीय लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे.

त्यामुळे या प्रभावापासून दलित, शोषित, पीडित, कष्टकरी व बहुजन समाजाला वाचविण्यासाठी व शासकीय महामारीत आधार म्हणून प्रत्येक त्रस्त व्यक्तीला १० हजार रुपये महाराष्ट्र शासनाने मदत करावी. अशा आशयाचे मुख्यमंत्र्यांच्या नावानं निवेदन बहुजन समाज पार्टीचे नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा प्रभारी नागोराव जयकर व महाराष्ट्र प्रदेश कार्यालयीन सचिव उत्तम शेवडे यांच्या नेतृत्वात नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश ठाकरे यांच्या मार्फत देण्यात आले.

रोग प्रतिबंधक उपाय म्हणून रेमडेसिविर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून 1350 रुपयाला मिळणारे इंजेक्शन 15 ते 50 हजारापर्यंत काळ्या बाजारात विकल्या जात आहे. व्याकसिंन च्या कमतरतेमुळे अनेकांना याचा फटका बसत आहे. व्हाक्सीन सेंटर औषध व डॉक्टर अभावी बंद पडत आहेत.


म्हणून शासनाने आपल्या यंत्रानेमध्ये वाढ करावी. गरिबांना योग्य ती मोफत सुविधा द्यावी. व्हाक्सीनच्या काळ्या बाजारावर रोक लावावी. तपासणी अहवाल आठ तासाच्या आत उपलब्ध करून द्यावा. इंजेक्शन निशुल्क द्यावे. लॉकडाउन ची स्थिती व भीती निर्माण करण्याऐवजी सर्वसामान्यांना दैनंदिन जीवनात अडचण येणार नाही याची व्यवस्था करावी. वीज बिल माफ करावे. विद्यार्थ्यांना त्वरित शिष्यवृत्ती द्यावी. शाळा-कॉलेजचे शुल्क माफ करावे. दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या, शेतकऱ्यांना मोफत सुविधा पूरवाव्या, शासकीय रुग्णालयात सोई पूरवाव्या, खाजगी रुग्णालयाच्या अवाजवी बिलावर अंकुश ठेवावा, भीती पसरविणार्या बातम्यांवर अंकुश लावावा. आदी प्रकारच्या मागण्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत नमूद करण्यात आल्या.

निवेदन देताना नागपूर जिल्हा प्रभारी नितीन शिंगाडे, बसपा च्या मनपा सभापती वंदना चांदेकर, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, माजी जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, योगेश लांजेवार आदी प्रमुख कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

उत्तम शेवडे, कार्यालयीन सचिव महाराष्ट्र प्रदेश बसपा