Published On : Sat, May 4th, 2019

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या नऊ शाखांना एन.बी.ए. मानांकन

नागपूर: 1914 पासून शासकीय तंत्रनिकेतन नागपूर, तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात महत्वाचे योगदान देत आहे. मध्य भारतातील ही अग्रगण्य व स्वायत्त संस्था असून विविध नऊ अभियांत्रिकी शाखांना नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडीटेशनचे जागतिक दर्जाचे मानांकन नुकतेच प्राप्त झाले आहे. अशा प्रकारचे नऊ शाखांना एन.बी.ए. मानांकन प्राप्त करणारे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय नागपूर राज्यातील पहिले ठरले असल्याचे प्राचार्य सी.एस. थोरात यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

यावेळी एन.बी.ए. सेलच्या प्रमुख व समन्वयक डॉ. राजेश्वरी वानखडे व सहसमन्वयक प्रा. एस.एस. मुडे उपस्थित होते.

सदर संस्थेच्या एन.बी.ए. सेलने नऊ विभागांसाठी अवघ्या चार महिन्यात नियोजनबध्द काम करुन मानांकन मिळविले आहे. एन.बी.ए. चे मानांकन सिव्हिल इन्जिनियरिंग, मेकॅनिकल इन्जिनियरिंग, इलेक्ट्रीकल इन्जिनियरिंग, इलेक्ट्रोनिक्स ॲन्ड टेलीकम्युनिकेशन इन्जिनियरिंग, कम्प्युटर इन्जिनियरिंग, माईनिंग ॲन्ड माईन सर्व्हेईंग या शाखांना प्राप्त झाले आहे, असे डॉ. थोरात यांनी सांगितले.

जगभरातील विविध देशामध्ये तंत्रशिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी वॉशिंगटन ॲकॉर्ड या जागतिक परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व एन.बी.ए. या मंडळाने केले. एन.बी.ए. ला जून 2014 मध्ये जगातील तंत्रशिक्षण परिषदेचे सभासदत्व प्राप्त झाले.

अशा नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडीटेशनच्या तज्ञ मार्गदर्शक समितीने विविध अभियांत्रिकी शाखांची व महाविद्यालयाची गुणवत्ता वेगवेगळी परिमाणे तपासून मूल्यांकन केले. सदर समितीने संस्थेतील एकंदर शैक्षणिक वातावरण, संस्थेचे ध्येय्य, उदिष्टे, विद्यार्थ्यांचा निकाल, प्राध्यापक वृंदाचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, तंत्रनिकेतनातील सोयी व सुविधा, निरंतर प्रगती, विद्यार्थी सहाय्य व्यवस्था, संस्थेचे गव्हर्नंस इ. बाबींचे मूल्यांकन करुन गुणवत्तेच्या आधारावर मानांकन दिले.

एन.बी.ए. प्राप्त करण्यारिता अर्ज करणे, प्रीक्वालीफायर भरणे व उत्तीर्ण होणे, सेल्फ अप्रेझल रिपोर्ट भरणे व त्या आधारे समितीला सामोरे जाणे या प्रक्रियेतून संस्थेला जावे लागले तसेच एन.बी.ए. समितीच्या सभा, विविध शाखांचे विद्यार्थी, प्राध्यापकवृंद,पालक,माजी विद्यार्थी व इतर स्टेकहोल्डर्स सोबत देखील झाल्या आहेत.

अशा प्रकारचे एन.बी.ए. मानांकन मिळाल्यामुळे संस्थेला विशिष्ट दर्जा प्राप्त झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना देशात व परदेशात नोकरी मिळण्याकरिता सुलभ होणार आहे. मानांकनामुळे शासकीय तंत्रनिकेतन, नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशामध्ये संस्थेतीलन सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापकवृंद, कर्मचारी, संस्थेचे नियामक मंडळ, अभ्यास मंडळ व इतर सर्व समित्यांचे सदस्य तसेच उद्योगधंदे समूह यांचा मोलाचा वाटा आहे. अशा भावना प्राचार्य डॉ. चंद्रशेखर थोरात यांनी व्यक्त केल्या.