Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Apr 5th, 2018

  शेतकरी विमा योजनेतून सरकार शेतकऱ्यांना लुटतंय – अजित पवार


  सांगली (तासगाव): सरकारने शेतकरी विमा योजना आणली खरी परंतु या योजनेतून शेतकऱ्यांना लुटलं जात आहे. विमा कंपन्यांच्या घशात रक्कम घालण्यासाठीच ही विमा योजना राबवली जात असल्याची जोरदार टिका विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी तासगावच्या जाहीर सभेत केली.

  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाची चौथ्या दिवसाची पहिली सभा स्वर्गीय आबांच्या कर्मभूमीत तासगावमध्ये मोठय़ा उत्साहात पार पडली. या सभेत अजितदादांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

  दादांनी जाहीर सभेत हे सरकार पश्चिम महाराष्ट्रावर कसा अन्याय करत आहे हे सांगितले. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या शेतीपंपाचे वीज कनेक्शन कापले जात आहेत. वीज कनेक्शन मिळत नाहीय.हा मुद्दा मी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात मांडला आणि सभागृह बंद पाडले. त्यावर ऊर्जामंत्री बावनकुळे हे प्रत्येक शेतीला ट्रान्सफार्मर देण्याची माहिती देत आहेत. अरे कसं शक्य आहे. निव्वळ फेकू सरकार आहे, थापाडे सरकार आहे असा जोरदार प्रहारही दादांनी केला.

  या सरकारला शेतकऱ्याशी देणं-घेणं नाही. शेतकरी कुठं अडलाय हे जसं शरद पवारसाहेबांना कळत होतं तसं या सरकारला कळत नसल्याची टिकाही दादांनी केली. या सभेत दादांनी तासगावमध्ये घडलेल्या हाणामारीच्या घटनेवर भाष्य केले. एका पोलिस निरीक्षकाला भाजपचे लोक मारत आहेत. सत्ता येत जात असते, सत्तेची मस्ती अंगात चढता कामा नये. सर्वसामान्य लोकांनी आपल्याला त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी निवडून दिलेले असते. जनतेला विश्वास देवून काम केले पाहिजे परंतु इथे तर कायदाच हातात भाजपवाले घेत आहेत. आम्ही शांत आहोत. शांतच राहु द्या, जर आमच्या वाटयाला गेलात तर जशास तसे उत्तर देवू. आम्ही मेलेल्या आईचे दूध प्यायलेलो नाही असा इशाराही दादांनी दिला.

  दादांनी आपल्या भाषणामध्ये स्वर्गीय आबांच्या स्मृती यावेळी जागवल्या. आबा ही एक ताकद होती, एक कर्तृत्व, एक नेतृत्व शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आले होते असेही दादा म्हणाले.


  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणामध्ये आपल्या आक्रमक शैलीमध्ये सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाच शिवाय तासगावमध्ये भाजप खासदाराने पोलिसांना मारहाण केल्याचा मुद्दा उपस्थित करताना भाजपचा चांगलाच समाचार घेतला. सत्तेत आहात म्हणून धाक दाखवू नका. शरद पवार साहेबांनी आम्हाला सुसंस्कृत विचार दिले आहेत म्हणून आम्ही गप्प आहोत. याचा अर्थ असा नाही की, आम्ही सहन करु. उद्या दादा मुख्यमंत्री झाले की मग लक्षात ठेवा. ही लोकशाही आहे. मात्र या सरकारची हुकुमशाही सुरु असल्याची जोरदार टिका धनंजय मुंडे यांनी केली. त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतानाच त्यांनी इनके तो कुछ दिन बचे है, हम तो अभी आनेवाले है असं म्हणत सत्तेत येण्याचे संकेत उपस्थित कार्यकर्त्यांना देतानाच कामाला लागण्याचे आवाहन केले.

  शेतकरी अडचणीत सापडला आहे. राज्यात भारनियमनाचा फटका जनतेला बसत आहे. टोलमुक्ती झालेली नाही. जाहीर झालेले आरक्षण दिलेले नाही. विकास योजनांमध्ये ३० टक्क्यांची कपात केली मात्र राज्य कर्जबाजारी करण्याचे काम या सरकारने केले असल्याची जोरदार टिका विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील यांनी तासगावच्या सभेत केली.


  स्वर्गीय आबांनी तासगाव-कवठेमहाकाळ परिसराचा निधी आणून विकास केला. आबांच्या स्मृती चिरंतर जपण्याचे काम मतदारसंघात करण्यात आले आहे.आबांनी स्वाभिमानी कार्यकर्त्यांची फौज निर्माण केली आहे. आबांच्या विचारांशी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांशी नाळ जोडलेला कार्यकर्ता इथे आहे असे उदगार विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी तासगावच्या सभेत काढले. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीशी अशीच ताकद उभी करण्याचे आवाहनही केले.

  या सभेच्या सुरुवातीला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तासगावच्या प्रसिध्द गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर सभास्थळी स्वर्गीय आबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सभेमध्ये भाजपमधील स्वप्नील पाटील, दिलीप पाटील,प्रा. वल्लभ शेळके यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. सभेत आमदार श्रीमती सुमनताई पाटील यांनी मतदारसंघातील समस्या आणि सरकार कसे दुर्लक्ष करत आहे हे सांगितले.


  सभेला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, आमदार शशिकांत शिंदे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार श्रीमती सुमनताई पाटील, आमदार जयदेव गायकवाड, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, माजी मंत्री अण्णा डांगे, प्रवक्ते महेश तपासे, महिला जिल्हाध्यक्षा छाया पाटील आदींसह पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145