Published On : Thu, May 14th, 2015

नागपूर : नक्षलवादाचा सामना करण्‍यासाठी सरकार कटिबद्ध – केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग

Rajnath Singh  (2)
नागपूर। नक्षलवादाचा सामना करण्‍यासाठी शासन कटिबध्‍द असल्‍याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज नागपूर येथे केले.

नक्षलग्रस्‍त गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया जिल्‍हयांमधील सुरक्षेची आढावा बैठक आज रविभवन नागपूर येथे केंद्रीय गृहमंत्री श्री. राजनाथ सिंग यांच्‍या उपस्थितीमध्‍ये संपन्‍न झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी नक्षलवादाची समस्‍या ही महाराष्‍ट्राने आव्‍हान म्‍हणून स्‍वीकारली असे सांगून या समस्‍येवर महाराष्‍ट्र शासनाने केलेल्‍या उपाययोजनेसंबंधी समाधान व्‍यक्‍त केले.

नक्षलवादी केंद्र सरकारच्‍या विकास योजनांमध्‍ये अडथळा निर्माण करतात. नव्‍या केंद्र सरकारच्‍या स्‍थापनेनंतर सुरू झालेल्‍या विकास योजना या सर्व समाज घटकांसाठी उपयोगी असून त्‍यांच्‍या योग्‍य अंमलबजावणीसाठी शांततापूर्ण वातावरणाची गरज आहे. यासाठी आपले सरकार नक्षलवादयाशी चर्चा करण्‍यासाठी तत्‍पर आहे असेही त्‍यांनी आवर्जून सांगितले. गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया, या नक्षलग्रस्‍त जिल्‍हयांमधील शासनदरबारी प्रलंबित असलेल्‍या अहवालावर या बैठकीत सविस्‍तर चर्चा झाली.

Rajnath Singh  (3)
नक्षलग्रस्‍त जिल्‍हयांध्‍ये रस्‍त्‍यांचे जाळे मजबूत करण्‍यासाठी रोड रिक्‍वायर्मेंट प्‍लॉन-2 (आरआरपी-2) या योजनांची सुरूवात गडचिरोली जिल्‍हयाध्‍ये झाली असून सध्‍या बंद पडलेल्‍या एकीकृत कृती योजनेच्‍या पुढील वाटचालीसाठी आपली चर्चा पंतप्रधानासोबत चालू असल्‍याचेही श्री.सिंग यांनी सांगितले. राज्‍य शासनाला केंद्र सरकारतर्फे नक्षल समस्‍येच्‍या निराकरणासाठी सर्वोपरी मदत केली जाईल असे आश्‍वासनही त्‍यांनी यावेळी दिले.


राज्‍य पोलिस प्रशासन व निम लष्‍करी दल या समस्‍येचा मुकाबला यशस्‍वीरित्‍या करत आहेत. मागील 10 वर्षात नक्षली हल्‍ल्‍यामध्‍ये मृत्‍यु पडलेल्‍या सैन्‍य दलाचे जवान व नागरिकांचा मृत्‍युच्‍या प्रमाणात 20 ते 25 टक्‍के घट झाल्‍याचे त्‍यांनी यावेळी निर्दशनास आणून दिले.

या बैठकीला राज्‍यसभा खासदार अजय संचेती, राज्‍यांचे पोलिस महासंचालक,श्री.संजीव दयाल, वरिष्‍ठ पोलिस अधिकारी व राज्‍य शासनाचे वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते.
Rajnath Singh  (1)