Published On : Thu, May 14th, 2015

नागपूर : कारगावात प्रशासन आपल्या दारी, समाधान योजना शिबीरात 225 नागरिकांना लाभ

Solution plan  (10)
नागपूर। सुवर्ण जयंती राजस्व अभियानाअंतर्गत भिवापूर तालुक्यात कारगाव येथे समाधान योजना शिबीर भरविण्यात आले होते. नागपूर पासून 50 किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्याच्या आत अंदाजे 4 किलोमीटर गेल्यानंतर कारगावात प्रवेश होतो. गावात प्रवेश करताच निरनिराळया वाजंत्री चमूंचे फलक घरावर लागून दिसतात. या गावात वाजंत्र्यांच्या 10 पार्टी आहेत. लग्णाच्या मौसमात त्यांची चांगली कमाई होते. अशी माहिती सरपंच विनायक दडवे यांनी दिली. एकुणच कारगावचा उल्लेख समृध्द गाव म्हणून करावा लागेल. थोडे आत गेले की. आरोग्य केंद्र, तलाठी कार्यालय, प्राथमिक शाळा, बँक ऑफ इंडियाचे ए.टी.एम. केंन्द्र या सर्व सुविधा दिसतात.

अंदाजे तीन हजार लोकवस्तीच्या या गावात शेतकरी, विविध व्यावसायिक राहतात. शिक्षणाचे प्रमाणही चांगलेच कारण सरपंच विनायक दडके यांनी या गावातील तरुण विदेशात वास्तव्य करीत असल्याचे सांगितले. अशा या गावात जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांच्या कल्पनेतून साकारलेले समाधान शिबीर भरविण्यात आले होते. समाज मंदिरात असलेल्या शिबीरात महसूल विभाग, कृषी, महिला व बाल कल्याण, आरोग्य, पशुसंवर्धन, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी आपली दालने उघडली होती. भिवापूरचे तहसिलदार शीतल कुमार यादव, त्यांचे सहकारी नायब तहसिलदार योगेश शिंदे, दिनेश पवार यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या शिबीराला लोकप्रति‍निधी पंचायत समिती सदस्य सोपान दडवे, सरपंच विनायक दडवे यांची भरीव साथ लाभली. शासन व प्रशासन एकत्र आल्यास काय किमया घडू शकते. हे या शिबीरात दिसले. हजारोच्या संख्येने एकत्र आलेल्या या गावकऱ्यांमध्ये कामे करुन घेण्याची स्पर्धा सुरु होती.

Solution plan  (6)
सुरुवातीला शिबीराच्या उद्घाटनांचे सोपस्कर आटोपण्यात आले. उपविभागीय अधिकारी सौ. डॉ. दिप्ती सुर्यवंशी या तरुण महिला अधिकाऱ्यांनी सरस्वतीपूजन करुन उद्घाटन केले. उपविभागीय पदावर नुकत्याच रुजू झालेल्या धडाडीच्या अधिकारी डॉ. दिप्ती सुर्यवंशी यांनी शिबीर घेण्यामागील उद्देश समजावून सांगितला. यावेळी सोपान दडवे यांनी ग्रामीण भागातील नागरिकांसाठी समाधान योजनांचे वारंवार आयोजन करण्याची मागणी केली.

काल बुधवार, दिनांक 13 मे 2015 रोजी झालेल्या या समाधान योजना शिबीरात 27 भुखंडाचे पट्टे वाटप करण्यात आले. संजय गांधी योजनेचे 18 ओळखपत्र, 16 जात व उत्पन्न प्रमाणपत्र, 13 आधार कार्डची पोच पावती, 6 डिझेल व मोटरपंप वाटप, 35 रुग्णांची तपासणी, 52 पशुंची तपासणी तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील 7 विद्यार्थ्यांना टूल किटचे वाटप करण्यात आले.


Solution plan  (1)
कारगाव या छोटयाशा गावात ऊसाची शेती करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. त्यांना एकरी 30 टन उतारा मिळतो. याशिवाय गाई, म्हशीचा धंदा करणारेही बरेच तरुण आहेत. विशेष म्हणजे स्वच्छता अभियानात गावांमध्ये 300 स्वच्छता गृहे बांधून देण्यात आलीत. बॅंकेमार्फत 500 शेतकऱ्यांना 1 लाख रुपयापर्यंत कर्ज देण्यात आले. याशिवाय गावातील 35 दिवे सौरऊर्जेवर चालतात. अशा या कारगावामध्ये प्रशासन आणि शासनाने समाधान योजना शिबीर आयोजित करुन अनेकांना दिलासा दिला आहे. या गावात नेहमी शिबीरे भरवण्यात येतील असे आश्वासन तहसिलदार शितल कुमार यादव यांनी यावेळी दिले.

या शिबीरास जिल्हा परिषद सदस्या  दिपाली इंगोले, तालुका कृषी अधिकारी पुरी, पशुसंवर्धन विभागाच्या सहाय्यक आयुक्त निरगुडकर, तालुका पशुधन विकास अधिकारी वराडे, विस्तार अधिकारी चव्हाण, मंडल अधिकारी एस.एस.आमगावकर, तलाठी सुनिल मोवाडे यांनी हे शिबीर यशस्वी करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.
Solution plan  (11)
Solution plan  (5)
Solution plan  (7)