| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Oct 17th, 2019

  गोसीखुर्द बुडित क्षेत्राचा आराखडा पुन्हा तयार केला : पालकमंत्री बावनकुळे

  कुही, राजोला, वेलतूर येथे जाहीरसभा

  नागपूर: गोसीखुर्द प्रकल्पात गेलेल्या बुडित क्षेत्राचा आराखडा काँग्रेसच्या काळात योग्यरीत्या न बनल्यामुळे भाजपाच्या सरकारने पुन्हा बुडित क्षेत्राचा आराखडा तयार केला असून गोसीखुर्दमधील जे प्रकल्पग्रस्त पुनवर्सन व मदतीपासून वंचित राहिले आहेत, त्यांच्यावर आता अन्याय होणार नाही, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज वेलतूर येथील जाहीरसभेत दिली.

  कुही, राजोला व वेलतूर येथे तीन जाहीरसभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या तीनही जाहीरसभांना नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. याप्रसंगी भाजपाचे उमरेड विधानसभेचे उमेदवार सुधीर पारवे, आस्तिक पाटील सहारे, जिल्ह्याचे महामंत्री अरविंद गजभिये, भागेश्वर फेंडर, डॉ. मेश्राम, सुरेश बोराडे, भीमराव मातीखाये, आनंद खडसेे, श्रीमती रजनी लोणारे, डॉ. प्रतिभा मांडवकर, श्रीमती वानखेडे व अन्य उपस्थित होते.

  याप्रसंगी बोलताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले- तुमच्या एका मताने या मतदारसंघात मुख्यमंत्री सडक योजना आली, पंतप्रधान ग्रामसडक योजना आली. पालकमंत्री पांदन रस्ते आले आणि शासनाच्या 45 योजना या गावात येऊन गरीबांना त्याचा लाभ मिळाला. एका मताची ही कमाल आहे. कमळावरील सुधीर पारवे यांना निवडून दिले म्हणून या योजना आल्या. पुन्हा या मतदारसंघाचा आणि गावाचा विकास करायचा असेल तर सुधीर पारवे यांच्या नावासमोरील कमळ चिन्हाची बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

  काँग्रेसच्या काळात वीज बिलाचे पैसे भरले नाही तर ट्रान्सफॉर्मरवरूनच लाईन कापली जात होती, असे सांगताना पालकमंत्री म्हणाले- भाजपाचे सरकार आल्यानंतर पाच वर्षात शेतकर्‍यांकडे थकबाकी असतानाही एकाही शेतकर्‍याच्या कृषीपंपाची वीज कापण्याचे पाप या सरकारने केले नाही. यावेळी टाळ्यांच्या कडकडाटात नागरिकांनी पालकमंत्र्यांच्या भाषणाला प्रतिसाद दिला.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145