Published On : Fri, Apr 6th, 2018

भाजपला गोपीनाथ मुंडेंचा विसर, मेळाव्यातच कार्यकर्त्यांनी केला हंगामा

Advertisement


मुंबई : भाजपने मोठा गाजावाजा करत आपल्या ३८ व्या स्थापना दिनानिमित्ताने मुंबईतील एमएमआरडीएच्या मैदानात भव्य मेळावाचे आयोजन करण्यात आलेय. राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आलेय. मात्र, कार्यकर्त्यांनी कार्यक्रम ठिकाणी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे साधे पोस्टर तसेच फोटो नसल्याने नाराज झालेत. त्यांनी कार्यक्रम ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजप नेत्यांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळालेय

राज्यभरातून मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. भाजपच्या या कार्यक्रमातील एकाही पोस्टरवर गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नाही. आमच्या साहेबांचा कसा विसर पडला, असे सवाल उपस्थित करत बीडचे मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झालेत. कार्यक्रम सभास्थळी काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. आमच्या नेत्याचा फोटो किंवा पोस्टर लावा, अशा घोषणा दिल्यात.

दरम्यान, सभा ठिकाणी गोंधळ झाल्याची माहिती मिळताच गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी तात्काळ पुढे सरसावल्यात. त्यांनी नाराज कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते आक्रमक होत असल्याचं लक्षात आणून दिल्यानंतर मुंडे भगिनींनी मंचावरून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केले.