Published On : Tue, Nov 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ७ नोव्हेंबरला रंगणार ‘गूँज ऑफ़ सीताराम’;‘हनुमान अंश’ चित्रपटाची टीम सादर करणार भक्तिगीते

Advertisement

Auto Draft

नागपूर : भक्तिसंगीत, रामभक्ती आणि सामूहिक गायनाचा सुरेल संगम अनुभवण्याची संधी नागपूरकरांना मिळणार आहे. झिरो माईल यूथ फाउंडेशनच्या वतीने येत्या ७ नोव्हेंबर रोजी ‘गूँज ऑफ़ सीताराम’ या भव्य भजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मानकापूर इनडोअर स्टेडियम येथे सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार असून, नागपुरातील सर्वांत मोठी भजन बैठक म्हणून त्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे लोकप्रिय ‘हनुमान अंश’ चित्रपटाची टीम. चित्रपटाचे दिग्दर्शक व लेखक विशाल चतुर्वेदी, संगीत दिग्दर्शक शंतनू सुदामे आणि धीरेंद्र मुलकलवार, गायक साधू सुशील तिवारी व सुनील लोधी यांच्यासह सुमारे २० सदस्यांची टीम यावेळी उपस्थित राहणार आहे. चित्रपटातील ‘हे खरारी’, ‘पार्वती’ आणि ‘जय हनुमान’ यांसारखी लोकप्रिय भक्तिगीते सादर केली जाणार आहेत.

Auto Draft

नीम करोली बाबा यांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन ‘हनुमान अंश’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या हा चित्रपट सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चित्रपटाच्या टीमसोबत थेट भक्तिगीतांचा आनंद घेण्याची संधी नागपूरकरांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे.

Advertisement

‘संगीत में भक्ति, भक्ति में सभी का संग’ या संकल्पनेवर आधारित या बैठकीत भजन, सूफी संगीत, रामभक्ती, सामूहिक गायन आणि लाइव्ह जॅमिंगचा अनुभव घेता येणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असला तरी प्रवेशासाठी प्रवेशिका अनिवार्य राहणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्त्वावर बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. युवकांसह महिला आणि पुरुषांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पत्रकार परिषदेला आयोजकांची उपस्थिती-
कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला झिरो माईल यूथ फाउंडेशनचे कल्याण देशपांडे, प्रशांत कुकडे आणि समय बनसोड, जॅमिंग बैठकचे मयूर मोटवानी, नो डिफरन्स फाउंडेशन व हाफ टाइमचे हिमांशू अरमारकर, माहौलचे यश तुमाने आणि पारस रोकडे तसेच माधव नेत्रालयाचे सागर गभणे उपस्थित होते.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.