मुंबई : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिलेल्या अंदाजानुसार, यंदा मान्सून 8 ते 10 दिवस आधी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. यामुळे उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे आणि शेतीसाठीही ही परिस्थिती अनुकूल ठरणार आहे.
IMD च्या अंदाजानुसार, मान्सून 13 मेपर्यंत अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होईल. त्यानंतर 5 ते 6 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात 5 ते 7 जूनदरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
दरवर्षी मान्सून 9 ते 11 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात दाखल होतो, परंतु यंदा मान्सून लवकर येण्यामुळे दक्षिण कोकणात 5 जूनपासून आणि मुंबई-पुण्यात 7 ते 8 जूनपर्यंत मान्सून पोहोचण्याचा अंदाज आहे.
यंदा एल निनोचा प्रभाव नसल्यानं आणि ला निनासारखी अनुकूल स्थिती निर्माण झाल्यामुळे पावसाचं प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या 105% पर्यंत राहू शकतं. यामुळे महाराष्ट्रासह पश्चिम आणि दक्षिण भारतात समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी मान्सूनच्या लवकर आगमनामुळे खरीप हंगामाच्या पेरणीसाठी योग्य वेळ मिळणार आहे. त्यामुळे पीक नियोजन सुधारण्यास मदत होईल आणि उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या 50 दिवसांपासून सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त होते, पण आता 13 मेपासून मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तापमानात घट होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल.